निलंगा उपजिल्हा रुग्णालयाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST2021-05-05T04:31:52+5:302021-05-05T04:31:52+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशा परिस्थितीत काही रुग्णांना ऑक्सिजन खाटांची आवश्यकता भासत आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यामुळे ...

निलंगा उपजिल्हा रुग्णालयाच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशा परिस्थितीत काही रुग्णांना ऑक्सिजन खाटांची आवश्यकता भासत आहे. सध्या ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यामुळे रुग्ण दगावण्याची अधिक भीती निर्माण झाली आहे. ही गंभीर समस्या पाहून मराठा सेवा संघाने उपजिल्हा रुग्णालयाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अशोकराव पाटील निलंगेकर यांनीही पुढाकार घेत येथील व्यापाऱ्यांची बैठक घेतली. सर्व व्यापाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त २५ खाटांची लवकरच व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. तसेच येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर बाळू उर्फ लक्ष्मीकांत सोमानी व श्रीकांत तोष्णीवाल यांनी पुढाकार घेऊन उपजिल्हा रुग्णालयास चार दिवसांपूर्वी फिल्टर व थंड पाण्याचा प्लान्ट बसवून देण्यात आला. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौंदाळे यांची भेट घेऊन सर्जिकल साहित्याची कमतरता असल्यास त्याचाही पुरवठा करण्याचे मराठा सेवा संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती व छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या ग्रुपने सांगितले.
अक्का फाऊंडेशनतर्फे मोफत भोजन व्यवस्था...
२२ एप्रिलपासून अक्का फाऊंडेशनतर्फे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कोरोना बाधितांच्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दररोज सकाळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच शासकीय यंत्रणा कोलमडू नये. तसेच सामान्य नागरिकांना आधार मिळावा म्हणून शहरातील विविध सामाजिक संस्थांनी हिरीरीने पुढाकार घेऊन शासन व आरोग्य कर्मचाऱ्यांस मदत करीत असल्याचे दिसून येत आहे.