उड्डाणपुलांवरील पथदिव्यांअभावी नागरिकांची गैरसोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:11+5:302021-08-25T04:25:11+5:30
उदगीर शहराचा वाढता भौगोलिक विकास पाहता शासनाने शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर केले आहेत. उदगीर-लातूर मार्गावरील नळेगाव रोड येथील व ...

उड्डाणपुलांवरील पथदिव्यांअभावी नागरिकांची गैरसोय !
उदगीर शहराचा वाढता भौगोलिक विकास पाहता शासनाने शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर केले आहेत. उदगीर-लातूर मार्गावरील नळेगाव रोड येथील व बीदर रोडवरील दोन उड्डाणपूल सध्या कार्यान्वित आहेत. या उड्डाणपुलांच्या पलीकडे शहराची उपनगरे व ग्रामीण भाग असल्यामुळे या दोन्ही उड्डाणपुलांवर रात्रीच्या वेळी मोठी वर्दळ असते. नगरपालिकेने मागील अडीच वर्षांपूर्वी नळेगाव रोडवरील उड्डाणपूल मंजूर करण्याबाबतचा एकमुखी ठराव मंजूर केला. परंतु, त्या ठरावाचे पुढे काय झाले हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. रात्रीच्या वेळी या उड्डाण पुलावरून जाताना नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधले खरे मात्र या उड्डाणपुलांवरून रात्रीच्या वेळी जाण्या-येण्यासाठी पथदिवे नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. पथदिवे बसविल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल, त्यामुळे पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे.
निवेदन देऊनही मागणीकडे दुर्लक्ष...
उड्डाणपुलांचा वापर करणाऱ्या एसटी कॉलनी भागातील नागरिकांनी तीन वर्षांपूर्वी उदगीरच्या नगरपालिकेला निवेदन देऊन उड्डाणपुलांवर पथदिवे बसवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेने ठराव घेतला. मात्र, अंमलबजावणीच केली नाही. दरम्यान, नगरपालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना तरी या ठरावाची अंमलबजावणी होते की नाही, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.