उदगिरात अवैध वाहतूक पुन्हा बिनधास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:50+5:302021-08-14T04:24:50+5:30
तालुक्यात उदगीर शहर, ग्रामीण व वाढवणा हे तीन पोलीस ठाणे आहेत. शहर व ग्रामीण ठाण्याच्या वतीने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ...

उदगिरात अवैध वाहतूक पुन्हा बिनधास्त
तालुक्यात उदगीर शहर, ग्रामीण व वाढवणा हे तीन पोलीस ठाणे आहेत. शहर व ग्रामीण ठाण्याच्या वतीने वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, वाहतूकदार पोलिसांकडे दुर्लक्ष करीत शहरातील उमा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक परिसर या भागात बिनधास्त अवैध वाहतूक करीत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांना गर्दीच्या ठिकाणी पार्किंग देण्यात आल्याने त्याचा इतर वाहनधारकांसह पादचा-यांना त्रास होत आहे. अनेकदा स्थानकातून बस बाहेर येऊ शकत नाही, अशी परिस्थिती उद्भवते. तहसील कार्यालय व न्यायालय परिसरात वाहने थांबून राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो.
देगलूर रोड अरुंद असल्याने तर उर्वरित भागात दुकानदारांची अतिक्रमणे, वाहनांच्या पार्किंगमुळे समस्या निर्माण होत आहे. शहरातील तहसील कार्यालय व न्यायालयाच्या परिसरात भाजीविक्रेत्यांनी अतिक्रमण करून रस्ता व्यापला आहे. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
उदगीरकडे येणारा नळेगाव रस्ता, अहमदपूर रस्ता, बीदर रस्ता, जळकोट रस्ता, देगलूर रोड, जानापूर रस्ता यावर मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलीस व रस्ते परिवहन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. रस्ते वाहतूकचे अधिकारी लातूरहून उदगीरला कधी येणार, हे अवैध वाहतूकदारांना माहीत असते. त्या कालावधीत अवैध वाहतूक बंद ठेवली जाते. अधिकारी परतले की, पुन्हा वाहतूक सुरू होते.