अवैध वाळू वाहतूकदारांची महसूलच्या पथकास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST2021-05-22T04:18:55+5:302021-05-22T04:18:55+5:30
औश्याच्या तहसीलदार शोभा पुजारी व त्याच्यासोबतच्या पथकातील तलाठी विलास बिराजदार, रोहित धावडे, महसूलचे सहाय्यक वामन घोडके, कोतवाल महादेव अंधारे, ...

अवैध वाळू वाहतूकदारांची महसूलच्या पथकास धक्काबुक्की
औश्याच्या तहसीलदार शोभा पुजारी व त्याच्यासोबतच्या पथकातील तलाठी विलास बिराजदार, रोहित धावडे, महसूलचे सहाय्यक वामन घोडके, कोतवाल महादेव अंधारे, किशोर लोखंडे, अजय लांडगे, पांडुरंग पांचाळ हे शुक्रवारी दुपारी २ वा. च्या सुमारास औश्याहून पेट्रोलिंग करीत लिंबाळा- गुबाळ रस्त्यापर्यंत आले. तेव्हा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरु असल्याचे दिसले. तेव्हा तहसीलदार आणि पथकातील तलाठ्यांनी ट्रॅक्टर पकडला असता चालक पसार झाला. त्यामुळे तलाठी रोहित धावडे हे स्वतः ट्रॅक्टर चालवून किल्लारी पोलीस ठाण्यात आणत होते.
दरम्यान, आराेपी मधुकर सहदेव दंडगुले, सुधाकर सहदेव दंडगुले, दिनेश सहदेव दंडगुले हे तिघे तिथे दुचाकीवरुन आले आणि ट्रॅक्टरसमोर वाहन आडवे लावून इतर १६ नातेवाईकांना बाेलाविले. तेव्हा तहसीलदार आणि पथकासोबत बाचाबाची झाली. ट्रॅक्टर चालवित असलेले तलाठी धावडे व सोबतचे अंधारे यांनी ट्रॅक्टरवरुन खाली ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली. सदरील घटनेचे चित्रीकरण करीत असलेले तलाठी बिराजदार यांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत मारहाण केली. त्यानंतर ट्रॅक्टरसह सर्व आरोपी पसार झाले.
दरम्यान, किल्लारी पोलिसांनी धाव घेऊन आरोपी मधुकर दंडगुले, सुधाकर दंडगुले, दिनेश दंडगुले यांना अटक केली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३३२, ३७९, ३४१, ५०६, १४३, १८८, २६९ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि सुनील गायकवाड हे करीत आहेत.