उजनीचे पाणी लातूरला देण्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:02+5:302021-06-27T04:14:02+5:30
परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने लातुरात आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लातूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बाेलताना ते म्हणाले, मांजरा, तेरणा ...

उजनीचे पाणी लातूरला देण्याचा विचार
परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने लातुरात आलेल्या पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लातूर जिल्ह्यातील पाणीप्रश्नावर बाेलताना ते म्हणाले, मांजरा, तेरणा नद्यांवरील सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. ऊर्ध्व मनार सिंचन प्रकल्पासाठी ३८ काेटींची मागणी आहे. लातूर जिल्ह्यात १६ काेल्हापुरी बंधाऱ्यांचे रुपांतर आता बॅरेजेसमध्ये करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील तीरू नदीवरील ७ बंधाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पाणीसाठा ३० टीएमसी आहे. ३० टीएमसीपर्यंतचे सर्व माेठे तलाव येथे आहेत. ते पाणी अडविण्याचे प्रयत्न सुरू असून, लातूर जिल्ह्यात ज्या भागात कमी पाऊस पडताे, तेथे पाण्याचे संतुलन करण्याचे ठरविले आहे. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे जाते. ते पाणी उचलून लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यांसाठी वळण बंधाऱ्यातून आणण्याचा प्रयत्न आहे. यातून १० टीएमसी पाणी वळविण्यात येणार आहे. वैतरणी, कुकडी धरणांतील १६ ते १७ टीएमसी पाणी धरणे बांधून जायकवाडी धरणात आणता येणार आहे. अतिरिक्त पाणी माजलगाव धरणातून लातूर, बीड आणि उस्मानाबादसाठी आणता येणार आहे. यातून मराठवाड्यासाठी जादा पाणीवहन करण्याचा प्रकल्प अस्तित्वात येईल. लातूरला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उजनीतून करण्यात यावी, अशी मागणी आहे. याबाबत लवादाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून, कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घेतला जणार आहे. त्यासाठी सध्या अभ्यास करावा लागणार आहे, असेही जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसाेडे, आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
केंद्रीय यंत्रणांकडून त्रास देण्याचा प्रयत्न...
अनिल देशमुख यांच्यासह आघाडी सरकारमधील मंत्र्यांना जाणीवपूर्वक ईडीचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न हाेत आहे. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्राच्या यंत्रणांकडून केला जात आहे. अनिल देशमुख यांच्याबाबतीत पंधरा वर्षांपूर्वीच्या प्रकरणात पुन्हा चाैकशी केली जात आहे. यातून केवळ त्रास देणे, अडचणीत आणण्याचा हेतू समाेर आला आहे, असेही जलसंपदामंत्री पाटील म्हणाले.