मला गुण का कमी; शिक्षण मंडळाकडे तक्रारींचा ओघ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:17+5:302021-08-24T04:24:17+5:30
लातूर : अंतर्गत मूल्यमापनावर दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी अनेक विद्यार्थी, पालक गुण कमी मिळाल्याने नाराज ...

मला गुण का कमी; शिक्षण मंडळाकडे तक्रारींचा ओघ !
लातूर : अंतर्गत मूल्यमापनावर दहावी, बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी अनेक विद्यार्थी, पालक गुण कमी मिळाल्याने नाराज आहेत. या अनुषंगाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे तक्रारींचा ओघ होता. मला गुण का कमी, अशा तक्रारींचे निरसन करताना बोर्ड अधिकाऱ्यांची दमछाक झाली.
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले,
अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर झाल्यामुळे पुढे होणाऱ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षांच्या गुणांचा अंदाज बांधता येत नाही. शिवाय, अनेक शाळा-महाविद्यालयांनी गुणदान कसे केले, याबाबत साशंकता आहे. - विनोद कदम, पालक
निकालाच्या टक्केवारीचा फुगवटा जरूर दिसत आहे. परंतु, प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी हवी होती. ज्यामुळे गुणवान विद्यार्थ्यांना चांगले महाविद्यालय मिळाले असते. निकाल प्रक्रिया राबवायची म्हणून राबविल्याचे दिसत आहे. - संजय ढाले, पालक
विद्यार्थी म्हणतात
गुणदानाची प्रक्रिया किचकट होती. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांनाही कमी गुण मिळाले आहेत. माझ्या अनेक मित्रांना माझ्यापेक्षा जास्त गुण मिळाले, जे यापूर्वीच्या परीक्षेत माझ्या मागे होते.
- शुभम जाधव
नववीच्या आणि दहावीच्या चाचणी परीक्षेवर निकाल जाहीर केला. त्यामुळे दहावीला अपेक्षित गुण मिळालेले नाहीत. आता अकरावीसाठी सीईटी असती तर त्या परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध केली असती. - आकाश शिंदे
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
अंतर्गत मूल्यांकन झाल्याने पुनर्मूल्यांकन नाही की परीक्षा नाही. त्यामळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना काहीच वाव नाही. दाद मागण्यासाठी बोर्डाकडे धाव घेतली. परंतु, बोर्डाने थातूरमातूर उत्तरे दिली.
तक्रारींवर विद्यार्थी, पालकांचे निरसन
कमी गुण मिळाल्याच्या काही तक्रारी लातूर विभागीय शिक्षण मंडळाकडे आल्या होत्या. राज्य शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार विद्यार्थी व पालकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक पालकांचे समाधान झालेले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून सीलबंद पाकिटात आलेला निकाल आता ऑनलाईन जाहीर झाला आहे. त्यामुळेच बदल शक्य नसल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.