लांबोट्याच्या सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीतील शेकडो रोपे दिली टाकून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:38+5:302021-07-10T04:14:38+5:30
केळगाव : निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे सामाजिक वनीकरणाची नर्सरीतील शेकडो रोपे टाकून देण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून ...

लांबोट्याच्या सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीतील शेकडो रोपे दिली टाकून !
केळगाव : निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे सामाजिक वनीकरणाची नर्सरीतील शेकडो रोपे टाकून देण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत असून, त्यासाठी करण्यात आलेला शासनाचा खर्च निष्फळ झाल्याचे दिसून येत आहे.
निलंगा तालुक्यातील लांबोटा येथे सामाजिक वनीकरण विभागाची नर्सरी आहे. दोन ते तीन एकर जागेवर करंज, शेवरी, आवळा यासह अन्य रोपांच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिका तयार केली आहे. या रोपवाटिकेत गेल्या काही वर्षांपासून रोपांची निर्मिती केली जाते. रोपांना वेळेवर पाणी देऊन त्यांचे संरक्षण केले जाते. त्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. या रोपवाटिकेसाठी शासनाने कर्मचारीही नियुक्त केले आहेत.
दरम्यान, येथील रोपवाटिकेतील शेकडो रोपे फेकून दिल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. शासन एकीकडे वृक्षलागवड करावी, असे आवाहन करीत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत आहे. परंतु, रोपांच्या लागवडीसाठी आणि संवर्धनासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
वनविभागाच्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील लांबोटा, केळगाव या भागात रोपांची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे सामाजिक वनीकरण विभागाचे नियोजन नसल्यामुळे रोपवाटिकेतील रोपे टाकून देण्यात आली आहेत. या परिसरात मातीने भरलेल्या आणि रोपांची लागवड असलेल्या कॅरिबॅग टाकण्यात आल्याने पाण्याअभावी ती रोपे जळून गेली आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
रोपे उचलू न दिल्याने अडचण...
संबंधित नर्सरी ही भाड्याची असल्यामुळे त्या जमीन मालकाने आम्हाला झाडे उचलू दिली नाहीत. तिथे कर्मचाऱ्यांच्या अभावी ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे निलंगा येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. डी. श्रृंगारे यांनी सांगितले.
रोपवाटिका दाखविण्याचे काम...
शासनाचे लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतील शेकडो रोपे फेकून देण्यात आली आहेत.
झाडांची लागवड न करता नर्सरी जगविण्याचे प्रयत्न सुरू आहे की काय? असा सवाल असल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश लांबोटे यांनी केला आहे.