पोलीस वसाहतीतील घरांना तडे, झाडे-झुडुपे वाढल्याने भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:41+5:302021-05-23T04:18:41+5:30
देवणी : देवणीतील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. वसाहतीतील काही घरांना तडे गेले आहेत; तर परिसरात झाडे- झुडपे वाढली ...

पोलीस वसाहतीतील घरांना तडे, झाडे-झुडुपे वाढल्याने भीती
देवणी : देवणीतील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली आहे. वसाहतीतील काही घरांना तडे गेले आहेत; तर परिसरात झाडे- झुडपे वाढली आहेत. परिणामी, जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. कुटुंबाच्या संरक्षणासाठी पोलीस कर्मचारी नाईलाजास्तव शहरात भाड्याच्या घरात राहत आहेत.
देवणी येथील पोलीस ठाण्याच्या परिसरात जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १६ निवासस्थाने बांधण्यात आली. सुरुवातीपासूनच या घरांना समस्येचे ग्रहण लागले. कारण ही घरे अत्यंत कमी जागेत व छोटेखानी बांधण्यात आल्याने अधिक संख्या असलेल्या पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबास विविध अडचणी येत होत्या. मात्र, अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासह कसेबसे राहत होते. तसेच बांधकाम जागेसह वसाहतीत वीज, पाणी अशा समस्या होत्याच. दरम्यान, अलिकडील ५ ते १० वर्षांपासून या वसाहतीला भग्नावस्था प्राप्त झाली आहे.
वसाहतीतील भिंतींना तडे जाऊन इमारती खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यातच झाडे- झुडपे वाढली आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. शिवाय, सापही दिसून येत आहेत. परिणामी, पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबियांना जीव मुठीत धरुन रहावे लागत आहे. वसाहतीतील घरांच्या या समस्येमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
या समस्यांमुळे काही पोलीस कर्मचारी नाईलाजास्तव शहरात अथवा नजीकच्या उदगीर शहरात राहत आहेत. त्यामुळे रात्री- अपरात्री अथवा दिवसा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास बंदोबस्त लावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शिवाय, कर्मचारीही अन्य ठिकाणाहून ये-जा करण्यामुळे वैतागत आहेत.
सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचा-यांना ठाण्यात अथवा परिसरात थांबावे लागत आहे. यात विशेषत: महिला पोलीस कर्मचा-यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे.
येथील वसाहतीची दुरुस्ती अथवा नवीन वसाहत बांधण्याचे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
नवीन वसाहतीचा प्रस्ताव सादर...
येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थित निवारा नसल्याने मोठी अडचण होत आहे. याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती करीत आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी नव्याने येथील वसाहतीचा प्रस्ताव वरिष्ठांनी मागविला आहे. तो पाठविण्यात आला आहे, असे येथील पोलीस निरीक्षक सी. एस. कामठेवाड यांनी सांगितले.