रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; मोजावे लागतात पैसे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:51+5:302021-05-20T04:20:51+5:30
लातूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देणारी जिल्ह्यात एकूण २१ रुग्णालये आहेत. त्यापैकी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ...

रूग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे; मोजावे लागतात पैसे !
लातूर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देणारी जिल्ह्यात एकूण २१ रुग्णालये आहेत. त्यापैकी कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी सात शासकीय व आठ खाजगी हाॅस्पिटलला मंजूरी मिळाली आहे. असे असले तरी आतापर्यंत कोरोना बाधित आढळलेल्या ८५ हजार ६८४ रुग्णांपैकी केवळ २ हजार ४९१ रुग्णांनाच मोफत उपचाराची सुविधा मिळाली आहे. तर इतरांना उपचारासाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना ‘जनआरोग्य’चे वावडे आहे की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
फुप्फुसाच्या आजाराशी संबंधित जवळपास २० पॅकेजअंतर्गत कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार करण्याची सुविधा आहे. सामान्य पॅकेज हे दहा दिवसांचे असून त्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लागल्यास एक दिवसाच्या अंतराने या पॅकेजचे नूतनीकरणही करता येते. असे जिल्हा समन्वयक डॉ. कमल बाहेती यांनी सांगितले. जिल्ह्यात आजपर्यंत १ एप्रिल २०२० ते १७ मे २०२१ या कालावधीत जनआरोग्य योजनेतंर्गत १७ हजार ६४१ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. यामध्ये २ हजार ४९१ कोरोना रुग्णांचा तर ३३४ कोरोना सदृश्य आजाराच्या रुग्णांचा समावेश आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रूग्णालये - १५
एकूण कोरोनाबाधित - ८५६८४
कोरोनामुक्त - ७८१०१
मृत्यू - १८३३
सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण - ५७५०
योजनेचा लाभ घेतलेले रूग्ण - २४९१
केवळ २० हजारांचे पॅकेज...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ २० हजारांचे पॅकेज असल्याने रूग्णालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जात आहे. शासनस्तरावरून व्यवस्थित धोरण आखल्या गेले नाही. त्यामुळेच प्रश्न उपस्थित झाल्याचेही काही डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
नोंदणीसाठी जनआरोग्य मित्रांची नेमणूक...
योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील कोविड हाॅस्पिटलमध्ये जन आरोग्यमित्रांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची मदत रुग्ण घेऊ शकतात. वेळप्रसंगी संबंधितांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र टाकल्यास योजनेमध्ये रुग्णाचा अंतर्भाव करण्यास हे आरोग्यमित्र मदत करतात. दरम्यान, खासगी रुग्णालयांकडून काही अडचणी येत असल्यास योजनेचे जिल्हा समन्वयक आणि क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार किंवा संपर्क साधता येतो.
जिल्हाधिकाऱ्यांकडेही ई-मेलद्वारे तक्रार...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट तथा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या रूग्णालयांनी योजनेंतर्गत रुग्णास उपचार नाकारल्यास जिल्ह्याधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकीत्सक किंवा योजनेच्या जिल्हा समन्वयाकडे तक्रारी करता येतात.
योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न...
जिल्ह्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अनेकांना या योजनेतून मोफत उपचार मिळतात. तर अनेकांना योजनेविषयी माहिती नसते. त्यामुळे जनआरोग्य योजना लातूरच्या वतीने व्यापक प्रमाणात योजनेविषयी जनजागृती केली जात आहे. तसेच कोविड संदर्भात किंवा इतर आजारासाठी उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाताना आधारकार्ड आणि रेशनकार्ड सोबत ठेवावे. जेणेकरुन योजनेचा तात्काळ लाभ देता येऊ शकतो. जास्तीत जास्त रुग्णांना जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. कमल बाहेती यांनी सांगितले.