व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन
By हरी मोकाशे | Updated: September 1, 2022 16:14 IST2022-09-01T16:14:32+5:302022-09-01T16:14:58+5:30
पैस्यांची मागणी करत महिलेला दोघांनी घराबाहेर आणत केली मारहाण

व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन
उदगीर (जि. लातूर) : शहरातील बनशेळकी रस्त्यावरील भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून दोघांनी व्याजाच्या पैशाची मागणी करीत शिवीगाळ व मारहाण केली. यामुळे संतापाच्या भरात महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या जबाबावरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरा दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बनशेळकी रोड भागात राहणारी रेहाना महेबूब सय्यद (३४) यांच्या घरात गल्लीतील कविता दयानंद अंधारे व दयानंद अंधारे हे घुसले. त्यांनी सय्यद यांना झोपेतून उठवून घेतलेले ३० हजार व ११०० रुपये व्याज दे म्हणू लागले. तेव्हा त्यांनी माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. थोड्या दिवसांत पैसे देते असे म्हणाल्या. दरम्यान, दोघांनी शिवीगाळ केली.
तसेच कविता अंधारे हिने सदरील महिलेच्या केसाला धरून घराबाहेर आढत आणले. त्यामुळे फिर्यादी महिलेने रागाच्या भरात घरातील फवारणीचे औषध प्राशन केले. सदरील महिलेवर उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोघांविरुध्द उदगीर ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.