उदगीरात सोयाबीनला १० हजारांचा उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:21 IST2021-07-28T04:21:18+5:302021-07-28T04:21:18+5:30
उदगीर : येथील मार्केट यार्डमध्ये मंगळवारी सोयाबीनला उच्चांकी १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून, सर्वसाधारण दर ९ हजार ...

उदगीरात सोयाबीनला १० हजारांचा उच्चांकी दर
उदगीर : येथील मार्केट यार्डमध्ये मंगळवारी सोयाबीनला उच्चांकी १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून, सर्वसाधारण दर ९ हजार ८०० रुपये होता. दरात वाढ झाली असली तरी सोयाबीनची केवळ १ हजार क्विंटलची आवक झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची निर्माण झालेली कमतरता, देशांतर्गत झालेले कमी उत्पादन, खाद्य तेलाला असलेली मागणी या बाबींचा परिणाम सोयाबीनचे दरवाढीमध्ये होऊन आतापर्यंतचा उच्चांकी दर मिळत आहे. व्यापाऱ्यांकडील साठा संपला असून, बाजारात तुरळक आवक होत आहे. मागील वर्षी सोयाबीनचा हंगाम सुरू होण्याच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने या भागातील सोयाबीनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन राशीच्या वेळी पडलेल्या पावसामुळे बाजारात डागी झालेल्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. मालात असलेला ओलावा व डागीचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीन ३ हजार ५०० च्या आसपास भाव मिळत होता. त्यानंतर हळूहळू सोयाबीनचे दर वाढत ४ हजाराच्या आसपास स्थिरावले होते. मागील हंगामासाठी शासनाने ३ हजार ८८० हमीभाव जाहीर केला होता. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतरच सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सोयाबीनच्या पेंडीला व खाद्य तेलाला मागणी वाढतच चालली असल्याचा परिणाम दरवाढीस कारणीभूत ठरला आहे.
दर कमी होण्याची शक्यता कमीच...
आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सोयाबीनच्या पेंढीला व तेलाला मागणी असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढत आहेत. व्यापाऱ्यांकडील माल संपला असून, शेतकऱ्याकडे असलेल्या मालाला आता चांगले दिवस आलेले आहेत. नवीन हंगाम येण्यासाठी आणखी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ शिल्लक आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यामधील तफावत पाहता येणाऱ्या काळात दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. सागर महाजन, सोयाबीन कारखानदार .
दर वाढल्याने शेतकऱ्यांतून समाधान...
मागील दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर वाढतील म्हणून दरवर्षी सोयाबीन ठेवत होतो; परंतु यंदा सुरुवातीला काही माल ३ हजार ७०० रुपयाने विक्री केला. त्यानंतर नेहमीप्रमाणेच दर वाढतील, या आशेने माल शिल्लक ठेवला. यंदा नशिबाने साथ दिली. मंगळवारी ९ हजार ८८० रुपयाने ७० क्विंटल सोयाबीन विक्री झाली.
बालाजी भोसले, शेतकरी.