लातूर जिल्ह्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:27 IST2021-06-16T04:27:17+5:302021-06-16T04:27:17+5:30
लातूर : जिल्ह्यात मृग बरसत असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत शिरुर ताजबंद, नागलगाव, तोंडार या तीन ...

लातूर जिल्ह्यातील तीन मंडलांत अतिवृष्टी
लातूर : जिल्ह्यात मृग बरसत असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत शिरुर ताजबंद, नागलगाव, तोंडार या तीन महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. तसेच काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने चाढ्यावर मूठ ठेवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
हवामान खात्याने यंदा वेळेवर पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मृगाला ८ जूनपासून प्रारंभ झाला आहे. सुरुवातीपासूनच वातावरणात बदल होऊन अधूनमधून पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद मंडलात ८०.५ मिलिमीटर, उदगीर तालुक्यातील नागलगाव मंडलात ६६.३ आणि तोंडार मंडलात ७५.८ मिलिमीटर पाऊस होऊन अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, काही ठिकाणी खरीप पेरणीला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आतापर्यंत लातूर तालुक्यात ८५, औसा ९०, अहमदपूर १५५.८, निलंगा ५७.२, उदगीर १६०.४, चाकूर १०५.९, रेणापूर १४७.०, देवणी ८६.५, शिरुर अनंतपाळ ५२.२, आणि जळकोट तालुक्यात ९४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.