औराद शहाजानी परिसरात दमदार पाऊस, १६ हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:46+5:302021-07-10T04:14:46+5:30
औराद शहाजानी परिसरात गेल्या आठवड्यापासून चांगला दमदार पाऊस पडत आहे. बुधवार व गुरुवारी या दोन दिवसांत झालेल्या पावसाने पाणी ...

औराद शहाजानी परिसरात दमदार पाऊस, १६ हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा
औराद शहाजानी परिसरात गेल्या आठवड्यापासून चांगला दमदार पाऊस पडत आहे. बुधवार व गुरुवारी या दोन दिवसांत झालेल्या पावसाने पाणी पातळी वाढली आहे. औराद कृषी मंडळात चार महसूल मंडळांचा समावेश असून त्यात औराद व कासार बालकुंदा या महसूल मंडळात शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित हलगरा व अंबुलगा या दोन महसूल मंडळांत पेरणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत औराद मंडळात १६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. ७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला आहे, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील यांनी दिली.
या वर्षी सर्वाधिक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे मूग, उडदाचा पेरा कमी झाला. नगदी पीक व या वर्षी चांगला दर साेयाबीनला मिळाल्याने शेतकरी साेयाबीनकडे वळले आहेत.
औराद बंधाऱ्यात एक मीटरने पाणी वाढले...
जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला असून गत नऊ दिवसांत १२० मिमी पाऊस औराद मंडळात झाला आहे. त्यामुळे तेरणा नदीवरील औराद उच्चस्तरीय बंधाऱ्यात एक मीटरने पाणीसाठा वाढला आहे. सोनखेड उच्चस्तरीय बंधाऱ्यात दोन मीटर पाणीसाठा झाला आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस चांगला पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत.