औराद परिसरात मुसळधार, जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:51+5:302021-07-19T04:14:51+5:30
औराद शहाजानी व परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात होत ...

औराद परिसरात मुसळधार, जनजीवन विस्कळीत
औराद शहाजानी व परिसरात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस कमी अधिक प्रमाणात होत असून, रविवारी मोठा पाऊस झाला. या पावसाने राष्ट्रीय महामार्गावर ४ किमी अंतरापर्यंत पाणी वाहत होते. आजूबाजूच्या शेकडो घरांनी व दुकानांनी पाणी शिरले. परिसरातील पिके वाहून गेली असून, अनेक शिवारातील जमिनीही वाहून गेली आहे. औराद उच्चस्तरीय बंधाऱ्याची दोन दारे व तगरखेडा बंधाऱ्याची पाच दारे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या पावसामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती.
लातूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जवळपास ४ किमी पाण्याखाली असून, महामार्गावर तीन ते चार फूट वरून पाणी वाहत आहे. महामार्गालगत असलेल्या ५० ते ६० दुकानांत, तसेच आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसले. पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतूक बंद होती. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील यांच्या घराला चारी बाजूंनी पाण्याने वेढले आहे. शिवनगरमधील देविदास काळे, सिद्धेश्वर खानावळ, महाराष्ट्र विद्यालय, वसंतराव पाटील विद्यानिकेतन, प्रीतम हॉटेल, पाटील जनरल स्टोअर्स, नाईकवाडी सर्व्हिसेस आदी दुकाने, आस्थापना आणि शाळांच्या परिसरात पाणी घुसले आहे.
पाऊण तासात धो-धो पाऊस, जिकडे तिकडे पाणीच पाणी
पाऊण तासामध्ये पडलेल्या पावसामुळे जिकडेतिकडे पाणीच पाणी झाले. या कालावधीत ५६ मिमी पाऊस झाला असून, तेरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील उच्चस्तरीय बंधारे भरले असून, दोन्हीही बंधाऱ्याची दारे उघडण्यात आली आहेत. तगरखेडा येथील ओढ्याच्या पुलावर पाणी आल्याने तीन तास वाहतूक बंद होती. तगरखेडा येथील मुहम्मद मुल्ला, लक्ष्मण सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, पिंटू सूर्यवंशी आदींच्या घरात पाणी घुसल्याने नुकसान झाले.