उदगीर, औराद शहाजानी परिसरात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:19+5:302021-06-28T04:15:19+5:30
उदगीर परिसरातील काही भागांत जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे काही भागांतील खरीप पेरण्या झाल्या. पिकांची ...

उदगीर, औराद शहाजानी परिसरात दमदार पाऊस
उदगीर परिसरातील काही भागांत जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे काही भागांतील खरीप पेरण्या झाल्या. पिकांची उगवणही झाली आहे. त्या ठिकाणच्या पिकांना आता पावसाची गरज आहे. रविवारी सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास शहर व परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. लोणी, मलकापूर, सोमनाथपूर, शेल्हाळ, मोघा, रावणगाव, तादलापूर आदी गावांत दुपारी पाऊस झाला.
औरादमध्ये ४१ मि.मी. पाऊस
औराद शहाजानी परिसरात रविवारी सकाळी व दुपारी चांगला भीजपाऊस झाला. मृग निघाल्यापासून औराद परिसरात एकच पाऊस झाला हाेता. त्यामुळे काही गावांतील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. बहुतांश भागात पेरणीयाेग्य पाऊस न झाल्याने अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. रविवारी सकाळी व दुपारी चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीस सुरुवात होणार आहे. औराद येथील हवामान केंद्रावर ४१ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे.