शिरूर अनंतपाळ तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:20 IST2021-05-08T04:20:20+5:302021-05-08T04:20:20+5:30
मे महिना म्हणजे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा असे काहीसे चित्र असते परंतु यंदा मे महिन्याची सुरुवातच वादळी पावसाने ...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस
मे महिना म्हणजे कडक ऊन आणि प्रचंड उकाडा असे काहीसे चित्र असते परंतु यंदा मे महिन्याची सुरुवातच वादळी पावसाने झाली असून, मागील आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे परंतु मागील तीन दिवसांपासून सांयकाळी सलग मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या रबी हंगामातील पिकांच्या राशीचा मौसम सुरू झाला असून, अनेक शेतकरी ज्वारी, गहू, हरभरा यांच्या राशी करत आहेत परंतु मागील तीन दिवसांपासून सायंकाळी सलग पाऊस पडतो आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ज्वारी काळी पडण्याची भीती....
तालुक्यात जवळपास ५ हजार हेक्टर्स पेक्षा अधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या बहुतांश शेतकरी ज्वारीच्या राशी करत आहेत परंतु मागील तीन दिवसांपासून सलग वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली आहे. तालुक्यात ४० हेक्टर्सपेक्षा अधिक आमराई आहे. यंदा आंब्याच्या झाडाला चांगली फळधारणा झाली आहे परंतु मागील तीन दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. त्यामुळे आमराईचे मोठे नुकसान झाले आहे.