खिचडीतून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित; १२ जणांची प्रकृती ठणठणीत
By आशपाक पठाण | Updated: September 13, 2023 21:30 IST2023-09-13T21:29:00+5:302023-09-13T21:30:59+5:30
याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक रणजीत फड यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी लावण्यात आली आहे.

खिचडीतून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित; १२ जणांची प्रकृती ठणठणीत
उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील तोंडार येथील जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली होती. यातील १२ जण ठणठणीत झाले असून आता बुधवारी केवळ ३ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक रणजीत फड यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी लावण्यात आली आहे.
उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एकूण १५ विद्यार्थ्यांपैकी १२ जणांना उपचारानंतर बुधवारी दुपारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अद्याप तीन विद्यार्थ्यांच्या अंगात ताप व डोकेदुखीचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अधिष्ठाता डॉ. अजय महिंद्रकर यांनी सांगितले. शाळेतील ७२ विद्यार्थ्यांची तालुका आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करून उपचार केले आहेत.
मुख्याध्यापकाची चौकशी होणार...
उदगीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी यांनी बुधवारी तोंडार जि.प.शाळेला भेट देवून अहवाल सादर केला आहे. याप्रकरणी या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रणजीत फड यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. तसेच खिचडी शिजविणारी स्वयंपाकी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.