उदगीरात घर फोडून अडीच लाखांचा ऐवज पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:44+5:302021-05-27T04:21:44+5:30
उदगीर (जि. लातूर) : शहरातील देगलूर रोडवरील एका आश्रमशाळेच्या बाजूला असलेल्या घरात कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा पत्र्याचा ...

उदगीरात घर फोडून अडीच लाखांचा ऐवज पळविला
उदगीर (जि. लातूर) : शहरातील देगलूर रोडवरील एका आश्रमशाळेच्या बाजूला असलेल्या घरात कुणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचा पत्र्याचा दरवाजा वाकवून कपाटातील रोख ५० हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, उदगीरातील शंकर माध्यमिक आश्रमशाळेजवळ फिर्यादी अनुजा संतोष बिरादार यांचे घर आहे. त्यांच्या पतीस कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यात आले होते. पतीच्या उपचारासाठी जाताना घराला कुलूप लावले होते. उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाल्याने फिर्यादी पत्नी ही काही दिवस त्यांच्या आजोळी राहिली. मंगळवारी त्या आपल्या मावशीसोबत उदगीरच्या घरी आल्या असता घराचा पत्र्याचा दरवाजा वाकलेला दिसून आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता अज्ञात चोरट्याने दरवाजा वाकवून घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याच्या चार तोळ्याच्या पाटल्या, सोन्याचे दीड तोळ्याचे मिनी गंठण, पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या, कानातील तीन ग्रॅमचे सरपाळे, चार ग्रॅमचे झुमके, चांदीची चार तोळ्याची चेन, चांदीचे चार तोळ्याचे हातातील कडे व रोख ५० हजार असा एकूण दोन लाख ६० हजार रुपयांचा ऐवज पळविल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.