हसाळाची जि. प. शाळेची वर्गखोली कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:53+5:302021-07-19T04:14:53+5:30
हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सध्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत, मात्र शाळेतील ...

हसाळाची जि. प. शाळेची वर्गखोली कोसळली
हसाळा येथे १५० मुलांची शाळा आहे. बालवाडी आणि पहिलीचे वर्ग चालविले जातात. सध्या कोरोनामुळे वर्ग भरत नाहीत, मात्र शाळेतील त्या वर्गखोलीला दरवाजा नसल्याने रविवारी काही मुले तिथे खेळत गेली. दरम्यान, सकाळी अचानक छताचा काही भाग पडल्याने रणजित अतुल पवार (वय ५ वर्षे) रामेश्वर बबनराव पाटील (वय ५ वर्षे) हे दोघे जखमी झाले. त्यानंतर शाळेतील त्या खोलीत कोणीच थांबले नाही. दुपारनंतर साडेतीनच्या सुमारास पूर्ण वर्गखोली कोसळली. त्याचे काहीजणांनी चित्रीकरण केले. कोरोनाने शाळा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला असून, हासाळा गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी कोरोना इष्टापत्ती ठरल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. शनिवारीसुद्धा त्या खोलीचा काही भाग पडला होता. दरम्यान, रविवारी शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, कार्यकारी अभियंता वलांडे, पंचायत समितीच्या अभियंता देशमुख, विस्तार अधिकारी कापसे, केंद्रप्रमुख बोयणे यांच्यासह पथकाने भेट देऊन पाहणी केली. तसेच काही ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांना कोणीही जखमी झाल्याचे सांगितले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, रविवारी दुपारनंतर वर्गखोली पडली असल्याचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितले. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील ॲड. शोमीतकुमार साळुंके यांनी वरिष्ठ अधिकारी व शासनाकडे लेखी तक्रार नोंदवली आहे.
खोली वापरात नव्हती...
घटनास्थळी भेट देऊन आलेले अधिकारी म्हणाले, वर्गखोली वापरात नव्हती. शिवाय तिथे कोणीही जखमी झाल्याचे आढळून आले नाही. कोणी तशी माहिती आमच्या समोर दिली नाही. दरम्यान, वर्गखोलीचे बांधकाम कधी झाले आणि ती कोसळली कशी, याबाबत खुलासा झाला नाही.
फोटो फाईल नेम : १८ एलएचपी स्कुल हसाळा १, २, ३