वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल
By हरी मोकाशे | Updated: March 18, 2023 17:29 IST2023-03-18T17:29:11+5:302023-03-18T17:29:26+5:30
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल
लातूर : जिल्ह्यातील रेणापूर शहरासह तालुक्यातील काही भागात तसेच चाकूर तालुक्यातील जानवळ परिसरात शनिवारी दुपारी दीड तास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे हाताशी आलेली रबी पिके मातीमोल झाली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच अवकाळी पाऊस होत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात रबी हंगामातील हरभरा, गहू, करडईची काढणी सुरु आहे तर ज्वारी कणसांनी बहरलेली आहे. या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची ज्वारी भुईसपाट झाली आहे.
जिल्ह्यातील रेणापूरसह तालुक्यातील काही भागात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह दीड तास जोरदार पाऊस झाला. तसेच गारपीट झाली. या पावसामुळे रबी पिकांबरोबरच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. आंबा, चिंच आणि द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. तसेच चाकूर तालुक्यातील जानवळ, उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात गारांचा पाऊस होऊन नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातही पाऊस झाला. या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्यात येतील, असे रेणापूरच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी सांगितले.