बांबू लागवडीतून एकरी एक लाखाच्या उत्पादनाची हमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:00+5:302021-04-19T04:18:00+5:30
शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या ...

बांबू लागवडीतून एकरी एक लाखाच्या उत्पादनाची हमी !
शिरूर अनंतपाळ : बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फलदायी असून, कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक असल्याने बांबूच्या लागवडीतून शेतकऱ्यांना एकरी एक लाखांपेक्षा अधिक उत्पादनाची हमी असल्याचे प्रतिपादन कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.
तालुक्यातील दैठणा येथे गुरुवारी किसान कट्ट्यावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी बांबू उत्पादनातील अग्रगण्य काॅनबॅक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कर्पे होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व्यंकटराव पाटील, प्रा. मनोहर सांगवे, भाऊराव पाटील, मेजर दिलीप बिरादार, बालाजी तोटे, कल्याणराव बिरादार, मेजर लक्ष्मण सांगवे, विनायक बिरादार, संदीपान पाटील, विश्वजित सांगवे, राजकुमार गुडे, हरिश्चंद्र बिरादार, गणेश पाटील, प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी पाशा पटेल म्हणाले, बांबूपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. बांबू हे शंभर टक्के कार्बनडायऑक्साईड शोषून घेते आणि शंभर टक्के ऑक्सिजन देते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी बांबूचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणून शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन किमान एक-दोन हेक्टर तरी बांबूची लागवड केली पाहिजे. लोदगा येथील अटल डिप्लोमा इंजिनिअरिंग काॅलेजच्या माध्यमातून टिश्यू कल्चर लॅबोरेटरीमध्ये ३० लाख बांबूची रोपे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे एकरी एक लाखापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आता बांबू लागवडीशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संजीव कर्पे यांनी काॅनबॅक संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात बांबूपासून अनेक व्यवसाय उभे केले जात असल्याचे सांगितले. रमेश मुळे यांनी सूत्रसंचालन केले.
जागतिक तापमान नियंत्रणासाठी पर्याय...
जागतिक तापमानात वाढ होत असल्याने जगात आज अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऋतूचक्रही बिघडले आहे. त्यामुळे जागतिक तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी बांबू लागवड हा एकमेव पर्याय आहे. बांधकाम व्यवसायात आता बांबूच्या वापरासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे बांबूची अत्यंत रेखीव घरे तयार केली जात आहेत. एवढेच नव्हे, तर बांबूपासून तयार करण्यात आलेल्या फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बांबूपासून सीएनजी, फर्निचर तर तयार होत आहेच. शिवाय कपडे, लोणचे, मुरंबा, राईस, ब्रश, आदी खाण्यापासून ते वापरापर्यंतच्या अनेक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबू रोटी, कपडा और मकान या मूलभूत गरजा भागविणारे पीक आहे, असेही पाशा पटेल म्हणाले.