उगवलेले सोयाबीन गोगलगाईंनी केले फस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:19+5:302021-07-20T04:15:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निलंगा : तालुक्यात यंदा उशिरा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करुन पेरणी केली. मात्र, ...

Growing soybeans is done by snails! | उगवलेले सोयाबीन गोगलगाईंनी केले फस्त !

उगवलेले सोयाबीन गोगलगाईंनी केले फस्त !

लोकमत न्यूज नेटवर्क

निलंगा : तालुक्यात यंदा उशिरा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करुन पेरणी केली. मात्र, उगवलेलं कोवळं सोयाबीन गोगलगाई फस्त करत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र, कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

निलंगा तालुक्यातील काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. दरम्यान, गत आठवड्यात पाऊस झाल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्या. सोयाबीन पीकही चांगले उगवले. परंतु, उगवलेल्या सोयाबीनवर गोगलगाईने हल्ला केला आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे कोवळे पीक गोगलगाईने फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे.

नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. तालुक्यात सोयाबीनचा ७० हजार हेक्टरवर पेरा झाला. मात्र, नव्या संकटाने शेतकरी धास्तावले आहेत. सोयाबीन पीक गोगलगाय फस्त करत असल्याने शेतकरी गोगलगाय वेचणीचे काम करत आहेत. दिवसभर शेतात फिरून गोगलगाय टोपल्यात जमा करून त्या शेतीच्या बाहेर टाकून देत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेत आहेत. परंतु, अपेक्षित माहिती मिळत नसल्याने अडचण येत आहे. दरवर्षी सोयाबीन फुलोऱ्यात आल्यानंतर खोडमाशी, लष्करी अळी, उंट आळी अशाप्रकारची संकटे येत असत. परंतु, यंदा गोगलगाईचे नवीन संकट आल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत...

तालुक्यातील बहुतांश भागात खरीप पेरणी झाली आहे. पण पावसाचा खंड पडल्याने पिकांवर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत. जेणेकरून गोगलगायींना थांबण्यासाठी अथवा आश्रयासाठी जागा मिळणार नाही. प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी पिकांना अथवा फळपिकांना आच्छादन करण्याचे टाळावे. सायंकाळी अथवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी जमा करून साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

शेतात अथवा फळबागांमध्ये सात ते आठ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे अथवा भाजीपाला पिकाचे ढीग तयार करून ठेवावेत. गोगलगाय दिवसा त्याठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याठिकाणी गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी जमा करून नष्ट करावीत. शेत अथवा बागेच्या सभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा ४ सेमी रुंदीचा पट्टा गोगलगायींना शेतात जाण्यास प्रतिबंधक म्हणून टाकावा.

रासायनिक पध्दतीचा अवलंब करावा...

कीटकनाशकांचे विषारी औषध तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा अधिक २५ ग्रॅम यीस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात (२०० ग्रॅम गुळ अधिक १० लीटर पाणी) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डिहीड (२.५ टक्के) ५० ग्राम मिसळावे. ते शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात अथवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे. तसेच विषारी औषध बनविण्यापूर्वी, कीटकनाशक हाताळताना, चेहरा, डोळे व शरिराचे संरक्षण करण्यासाठी हातमोजे, चष्मा वापरावा.

- रणजित राठोड, मंडल कृषि अधिकारी.

Web Title: Growing soybeans is done by snails!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.