एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवूनही मैत्री जपणारे नेतृत्व शिवराज पाटील-चाकूरकर: माजी खा. गोपाळराव पाटील गहिवरले..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:03 IST2025-12-13T18:02:08+5:302025-12-13T18:03:06+5:30
सुसंस्कृत राजकारणाचा शेवट : डॉ. गोपाळराव पाटील आणि शिवराज पाटील-चाकूरकर यांच्यातील राजकीय लढाई नेहमीच एक मैत्रीपूर्ण राहिली.

एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवूनही मैत्री जपणारे नेतृत्व शिवराज पाटील-चाकूरकर: माजी खा. गोपाळराव पाटील गहिवरले..!
लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघातून अनेकदा एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवूनही, कधीही एकमेकांवर टीका न करणारे व राजकारणात कोणालाही शत्रू न मानणारे शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या निधनाने सुसंस्कृत राजकारणाचा एक अध्याय संपला, अशा शब्दांत शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
डॉ. गोपाळराव पाटील आणि शिवराज पाटील-चाकूरकर यांच्यातील राजकीय लढाई नेहमीच एक मैत्रीपूर्ण राहिली. डॉ. पाटील म्हणाले, आम्ही दोघांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या, परंतु आम्ही कधीही एकमेकांवर टीका केली नाही. राजकीय विरोधक असले तरी त्यांचे संबंध नेहमीच जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक होते. राजकारणात शिवराज पाटील-चाकूरकर यांचा कोणीही शत्रू नाही वा विरोधक नाही. त्यांचे-आमचे कौटुंबिक संबंध होते. जिव्हाळ्याचे नाते आम्ही शेवटपर्यंत जपले. मैत्रीपूर्ण निवडणूक आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत गेलो. एका शब्दाची टीका एकमेकांवर झाली नाही, दु:ख व्यक्त करीत त्यांनी चाकूरकरांच्या सुसंस्कृत राजकारणाची महती सांगितली.
लोक उत्सुक असत, जिंकण्याची आशा नव्हती..!
लातूरच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून शिवराज पाटील-चाकूरकर आणि भाजपातून डॉ. गोपाळराव पाटील हे उभे राहणे नित्याचेच होते. त्यांच्या विरोधात जिंकून येण्याची कधीही आशा नव्हती, मात्र लोकांना या लढतीबद्दल उत्सुकता होती. चाकूरकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी असून, त्यांची प्रकृती ठणठणीत होती. त्यांना कोणताही शारीरिक आजार नव्हता.
दोन-अडीच महिन्यांपूर्वी शेवटची भेट
"दोन-अडीच महिन्यांपूर्वी आमची भेट झाली होती, ती शेवटची भेट ठरली, असे माजी खा.डॉ. पाटील यांनी सांगितले. राज्यसभेतील आठवणी सांगताना डॉ. पाटील म्हणाले, राज्यसभेत मी नवखा होतो, पण त्यांनी तिथे मला नवखेपणाची वागणूक दिली नाही. ते देशाचे महान नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे सुसंस्कृत राजकारणाचा शेवट झाला.