शेतात झाडाखाली थांबलेल्या आजी- नातीचा वीज पडून मृत्यू (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:28+5:302021-05-30T04:17:28+5:30
निलंगा/ कासार बालकुंदा (जि. लातूर) : शेतातील काम करण्यासाठी गेलेल्या आजी व नातीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा ...

शेतात झाडाखाली थांबलेल्या आजी- नातीचा वीज पडून मृत्यू (सुधारित)
निलंगा/ कासार बालकुंदा (जि. लातूर) : शेतातील काम करण्यासाठी गेलेल्या आजी व नातीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना निलंगा तालुक्यातील पिरू पटेलवाडी येथे शनिवारी दुपारी ४.३० वा. च्या सुमारास घडली.
ललिता नारायण इरलापल्ले (५०) व पायल सतीश इरलापल्ले (१०, दोघीही रा. पिरुपटेलवाडी, ता. निलंगा) असे मयत आजी व नातीचे नाव आहे. निलंगा तालुक्यातील पिरुपटेलवाडी येथील आजी ललिता इरलापल्ले व नात पायल इरलापल्ले या दोघी शनिवारी शेतातील खरीप हंगामपूर्व काम आटोपण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. तेव्हा आश्रयासाठी त्या दोघी दुसऱ्याच्या शेतातील झाडाकडे गेल्या आणि तिथे थांबल्या. तेव्हा अचानक वीज पडल्याने दोघींचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी तात्काळ तलाठी व पोलीस ठाण्याला माहिती दिली. तलाठी निळकंठ ननवरे यांनी पंचनामा करुन तहसीलदारांकडे अहवाल पाठविला आहे. या घटनेची कासारशिरसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडिलानंतर मुलगीही गेली...
मयत पायल हिचे वडील सतीश इरलापल्ले यांचा गेल्या वर्षी शेतातील काम करीत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबात आजोबा, आजी, आई, एक मोठी बहीण, ती आणि एक लहान भाऊ असे सहा जण राहत होते. कुटुंबास साडेतीन एकर शेती असून ती सासू, सून करीत असत. कारण आजोबा थकले आहेत. त्या दोघींना त्यांची दोन लेकरं मदत करीत असत. त्यावर उदरनिर्वाह होत असे. दरम्यान, शनिवारी वीज पडल्याने आजी, नातीचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. आता कुटुंबात मयत मुलीची आई, आजोबा, मोठी बहीण, भाऊ असा परिवार आहे, अशी माहिती सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी दिली.
मयत दोघींचे फोटो :
१. २८ एलएचपी ललिता इरलापल्ले
२. २८ एलएचपी पायल इरलापल्ले