दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:15+5:302021-02-15T04:18:15+5:30
सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयअंतर्गत केंद्र शासन व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर व पंचायत समिती उदगीरच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता ...

दिव्यांगांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील
सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयअंतर्गत केंद्र शासन व समाजकल्याण जिल्हा परिषद लातूर व पंचायत समिती उदगीरच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता शिबीर घेण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना सहायक उपकरणांचे निःशुल्क वितरण कार्यक्रमाचे आयोजन उदगीर येथील भागीरथी मंगल कार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी पाणीपुरवठा व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, सभापती शिवाजी मुळे, उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड, बापूराव राठोड, जिल्हा परिषद सदस्या उषा रोडगे, आदींसह पंचायत समिती सदस्य माधव कांबळे, मनोज चिखले, प्रा. श्याम डावळे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगले काम होत असून राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला पुढाकार राहणार असल्याचे सांगत उदगीरची पंचायत समिती मॉडेल पंचायत समिती बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, दिव्यांगासाठी निधी आणणारी लातूर जिल्हा परिषद देशात दुसरी व राज्यात पहिली जिल्हा परिषद असून लातूर जि.प.ला केंद्र सरकारकडून दिव्यांगाकरिता साडेआठ कोटी रुपये मिळाले असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी केले. यावेळी ४० लाभार्थ्यांना सहायक उपकरणे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. सुप्रिया पटवारी या दिव्यांग मुलीने मनोगत व्यक्त केले.
सभापती प्रा. शिवाजी मुळे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन ज्ञानोबा मुंडे यांनी केले, तर उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी आभार मानले.