घरणी प्रकल्पाच्या पाण्याचा तिढा आता शासन दरबारी !
By संदीप शिंदे | Updated: July 14, 2023 19:24 IST2023-07-14T19:23:39+5:302023-07-14T19:24:16+5:30
शिवपुर येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या महाराणा प्रतापनगरला नेण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली.

घरणी प्रकल्पाच्या पाण्याचा तिढा आता शासन दरबारी !
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी नेण्याच्या योजनेस विरोध करण्यासाठी पाणी बचाव समितीच्यावतीने मागील पंधरा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले. त्यामुळे घरणीचे पाणी लातूरला नेण्याचा तिढा निर्माण झाला होता. शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या उपस्थितीत पाणी बचाव समितीची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे पाण्याचा तिढा आता शासन दरबारी जाणार आहे.
शिवपुर येथील घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या महाराणा प्रतापनगरला नेण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यामुळे शेतकरी, सर्वपक्षीय नेते यांनी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी मध्यम प्रकल्प पाणी बचाव समितीची स्थापना करून पंधरा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन केले. त्याची दखल घेत शुक्रवारी जिल्हाधिकाऱी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जलसंपदा, पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी बचाव समितीचे सदस्य यांची बैठक घेऊन वस्तुस्थितीचा आढावा घेतला. तसेच याबाबत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन यावेळी दिले. त्यामुळे घरणीच्या पाण्याचा तिढा आता शासन दरबारी जाणार आहे. यावेळी पाणी बचाव समितीचे सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.