घरणी- साकोळच्या जलसाठ्यावर होणार २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:52+5:302020-12-08T04:16:52+5:30
शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०२०- २०२१ ...

घरणी- साकोळच्या जलसाठ्यावर होणार २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन
शिरुर अनंतपाळ : तालुक्यातील घरणी आणि साकोळ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने पाटबंधारे विभागाच्या वतीने सन २०२०- २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येऊन २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन पाणी वापर संस्थाच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे नियोजन येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव हे चारही प्रकल्प यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरले आहेत. घरणी आणि साकोळच्या पाणी साठ्यावर सन २०२०- २०२१ च्या रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन. मदने यांच्या अध्यक्षतेखाली येथील अनंतपाळ नूतन विद्यालयात पाणी पुरवठा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी ॲड. संभाजीराव पाटील, ॲड. विश्वंभराव माने, प्रभाकरराव कुलकर्णी, नामदेवराव जगताप, विठ्ठल उंबरगे, उपविभागीय अभियंता गोरख जाधव, शाखाधिकारी पी.व्ही. पाटील, मंडळ कृषी अधिकारी बी.एस. गाढवे, नितीन जुंबड, संग्राम डोंगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी कालवा आणि साठा सिंचन करण्यासाठी पाणी वापर संस्थांनी मदत केल्यास पाटबंधारे विभाग सिंचनाचे नियोजन करू शकते, अशी भूमिका गोरख जाधव यांनी मांडली. त्यामुळे पाणी वापर संस्थानी मदत करण्याची हमी दिली. २ हजार ६७२ हेक्टर्सवर सिंचन योजना राबविण्यात येऊन रब्बी हंगाम यशस्वी करण्यात येणार आहे. यावेळी विठ्ठल पाटील, जगदीश सूर्यवंशी, विठ्ठल शिंदे, अण्णाराव जाधव, माधव शिरुरे, बबन जाधव, गणेश पेठे, सद्विवेक मिरकले, शिवा डोंगरे, अंगद माने, पंडित लवटे, सुरेश पेठे आदींची उपस्थिती होती.
कालवा सिंचनाचे दोन आवर्तन...
रब्बी हंगामासाठी घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे सिंचनाच्या दोन फेऱ्या घेण्यात येणार असून कालवा सिंचनाच्या माध्यमातून ६३७ हेक्टरचे सिंचन करण्यात येणार आहे. घरणी आणि साकोळच्या पाणीसाठ्यावर २ हजार ३५ हेक्टर्स अशा एकूण २ हजार ६७२ हेक्टर्सचे सिंचन नियोजन करण्यात आले आहे.
घरणी प्रकल्पाचे उजवा आणि डावा असे दोन कालवे असून, दोन्ही कालव्याचे महिनाभराच्या अंतराने दोन आवर्तन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी चंद्रहास माने, राजेंद्र पांचाळ, मनोज जामगे, एस.पी. केजकर, अंजना होळकर, बस्वराज बिराजदार, बी.एम. मरे, गोविंद मोरे आदींनी पुढाकार घेतला आहे.