स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार, निलंगा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 05:39 PM2022-01-27T17:39:31+5:302022-01-27T17:54:48+5:30

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये ही घटना घडली असून, ग्रामस्थांकडून गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे.

Funeral in Nilanga taluka in front of Gram Panchayat as there is no cemetery | स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार, निलंगा तालुक्यातील घटना

स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार, निलंगा तालुक्यातील घटना

googlenewsNext

निलंगा (लातूर) - १५ ते २० वर्षांपासून स्मशानभूमीला शासनाकडून जागा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी मयत महिलेवर गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार केल्याची घटना गुरुवारी निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी अं.बु. येथे घडली आहे. तालुक्यातील हणमंतवाडी अ.बु. हे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात अद्यापही स्मशानभूमी नाही. त्यामुळे १५ ते २० वर्षांपासून गावातील नागरिक स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र, अद्यापि स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

गावातील सोजरबाई रामचंद्र निकम (७०) यांचे गुरुवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यामुळे नातेवाईक आणि नागरिकांनी गुरुवारी अंत्यविधीची तयारी सुरु केली. परंतु, अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा संतप्त नागरिकांनी गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन तिथेच केले. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात वादग्रस्त स्मशानभूमीच्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तेव्हा मयत रावण सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा सवाल करीत नागरिकांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती. तेव्हा तहसीलदारांनी निलंग्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, शेजारीच असलेल्या अंबुलगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पोलीस, महसूल प्रशासनास बोलावूनच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात...

सार्वजनिक स्मशानभूमीसाठी चार गुंठे जागा गावाने खरेदी केली होती. परंतु, संबंधित शेत मालकाने ती जागा गावातील एकास विक्री केली. विक्री करणारा आणि खरेदी करणारा हे दोघेही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रशासन यासंदर्भात कुठलाही पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

जिल्हाधिका-यांनी दखल घ्यावी...

गावात स्मशानभूमी तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासन अंत्यविधीसाठी जागा देत नाही. जिल्हाधिका-यांनी तात्काळ लक्ष देऊन जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, असे ग्रामस्थ धर्मराज लखने म्हणाले.

प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अंत्यसंस्कार...
गावात एखाद्याचा मृत्यू झाला की, पोलीस, महसूल प्रशासनास बोलावून मध्यस्थी करून अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र आता संबंधित शेतकरी शेतात अंत्यसंस्कार करू देत नाही. त्यामुळे तात्काळ स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सरपंच प्रभाकर मलिले यांनी केली.

अंबुलगा तलावानजीक जागा उपलब्ध...

गावाशेजारील २० गुंठे जमीन सार्वजनिक स्मशानभूमीसाठी १९८५ साली अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु, त्या जमिनीची खरेदी- विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, खरेदीदाराने न्यायालयातून मनाई हुकुम आणले आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांनी गावाशेजारील अंबुलगा तलावाजवळ अंत्यविधी करण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, काही नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करून अतिरेक केला आहे, असे तहसीलदार गणेश जाधव म्हणाले.

Web Title: Funeral in Nilanga taluka in front of Gram Panchayat as there is no cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.