१७ दिवसांपासून चार खेडी पाणीपुरवठा योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:20 IST2021-05-26T04:20:38+5:302021-05-26T04:20:38+5:30
रामवाडी साठवण तलावावरून देवकरा, दगडवाडी, हिंगणगाव, कोळवाडी या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रामवाडी साठवण तलावाजवळील जलयोजनेचा विद्युत ...

१७ दिवसांपासून चार खेडी पाणीपुरवठा योजना बंद
रामवाडी साठवण तलावावरून देवकरा, दगडवाडी, हिंगणगाव, कोळवाडी या चार गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रामवाडी साठवण तलावाजवळील जलयोजनेचा विद्युत डीपी जळाल्याने तेथून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे. नागरिकांचे हाल होत आहेत. नागरिकांना घागरभर पाण्यासाठी २ ते ३ किमी पायपीट करावी लागत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाण्यासाठी फिरणाऱ्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. वाढत्या उन्हामुळे जलस्रोत आटत असून विहिरीतील पाणीपातळी खालावत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पानगाव येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना भेटून रामवाडी तलावावरील पाणीपुरवठ्याची विद्युत डीपी बसविण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा त्यांनी वरिष्ठांना कळवून उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले; परंतु अद्यापही डीपी बसण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे देवकरा गावचे उपसरपंच भास्कर गुट्टे यांनी सांगितले.
रामवाडी तलावावरून चार खेडी पाणीपुरवठा योजना आहे. त्या योजनेचा विद्युत डीपी जळाला आहे. नवीन विद्युत डीपी बसविताना थकबाकी भरावी लागते. त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळविले आहे. थकबाकी भरल्याशिवाय डीपी बदलून देता येणार नाही, असे वरिष्ठांनी सांगितले. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने थकबाकी भरल्यास तत्काळ विद्युत डीपी बसविला जाईल.
- पवन शिंकरे, सहायक कनिष्ठ अभियंता.