गृहविलगीकरणातील बाधितांकडून संसर्ग रोखण्यासाठी पाच पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:21+5:302021-04-18T04:19:21+5:30
अहमदपूर : शहर व तालुक्यात गृहविलगीकरणात १ हजार १७२ कोरोनाबाधित आहेत. दरम्यान, हे रुग्ण घराबाहेर पडत असल्याने संसर्ग वाढत ...

गृहविलगीकरणातील बाधितांकडून संसर्ग रोखण्यासाठी पाच पथके
अहमदपूर : शहर व तालुक्यात गृहविलगीकरणात १ हजार १७२ कोरोनाबाधित आहेत. दरम्यान, हे रुग्ण घराबाहेर पडत असल्याने संसर्ग वाढत आहे. तो रोखण्यासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
अहमदपूर शहर व परिसरात सध्या १ हजार ३६० रुग्ण आहेत. त्यातील १ हजार १७२ गृहविलगीकरणात, तर ४८ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. संस्थात्मक विलगीकरणावर प्रशासनाचे नियंत्रण आहे. मात्र, होम आयसोलेशनमधील बाधित विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. दरम्यान, हे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या नियंत्रणासाठी पाच पथके नियुक्त करण्यात आली आहेत. येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ही पथके शहरातील बाधितांच्या घरांस भेटी देणार आहेत. ते नियमांचे पालन करीत आहेत का, काय जागा व्यवस्थित आहे, आहार पूर्ण घेतात का, ऑक्सिजनची स्थिती कशी आहे, याची माहिती संकलित करून टास्क फोर्सकडे सादर केली जाणार आहे. या पथकात तहसील कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल कर्मचारी व नगरपरिषदेच्या कर्मचारी अशा पाचजणांचा समावेश आहे. शहरातील गृहविलगीकरणात असलेल्या व्यक्तींशी थेट संपर्क साधून अथवा त्यांना भेट देऊन माहिती जमा करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दिली अथवा गृहविलगीकरण कक्षात नसल्यास त्याला दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.
१ ते ४० वयोगटांतील ८१० जणांना संसर्ग...
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. १ ते ४० वयोगटांतील ८१०, ४० ते ६० वर्षांतील ३८९, ६० वर्षांपुढील १७१ आणि १ ते १४ वयोगटातील २४ बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. गृहविलगीकरणातील काहीजण घराबाहेर खेळत आहेत. ग्रामीण भागातील कट्ट्यावर बसून संपर्क ठेवत आहेत. बाजारात जाऊन भाजीपाला, औषधे आणत आहेत. हे रोखण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.
विनाकारण बाहेर पडू नका...
सध्या राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. बाहेर पडल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येईल. तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत त्यांच्याकडील वाहनावरही कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी सांगितले.
तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्ण...
अहमदपूर शहरात ६८१, हडोळती - ६६, शिरूर ताजबंद- ११७, सताळा- ६७, थोडगावाडी- १२३, काजळ हिप्परगा- ७५, सोरा- १२, अंधोरी- ४०, बाबळदरा येथे २८ कोरोनाबाधित आहेत.