आधी गाडीवरून पाडले, नंतर डोक्यात वार केले; जुन्या भांडणावरुन एकाचा भररस्त्यात खून
By हरी मोकाशे | Updated: September 29, 2022 17:50 IST2022-09-29T17:49:17+5:302022-09-29T17:50:18+5:30
निलंगा ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल

आधी गाडीवरून पाडले, नंतर डोक्यात वार केले; जुन्या भांडणावरुन एकाचा भररस्त्यात खून
लातूर : जुन्या भांडणावरुन दोघांनी एकाच्या दुचाकीस कट मारुन रस्त्यावर खाली पाडले आणि डोक्यात मारुन गंभीर जखमी करीत खून केल्याची घटना निलंगा तालुक्यातील लांबोटा शिवारात घडली. याप्रकरणी बुधवारी दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील आरोपी गफुर महेताब तांबोळी, दिलीप गोविंद मुंजाळ या दोघांनी संगनमत केले. २३ सप्टेंबर रोजी रात्री जुन्या भांडणाच्या कारणावरुन मयत अतुल वसंतराव तुरे (३२, रा. लांबोटा, ता. निलंगा) यांच्या दुचाकीस (एमएच २४, एएच ८४७९) ला वरील दोघा आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच १४ ईएस ५७५२) ने कट मारली. त्यामुळे तुरे हे रस्त्यावर खाली पडले. दरम्यान, त्यांच्या डोक्यात वस्तूने मारुन गंभीर जखमी केले. त्यात त्यांचा खून झाला.
याप्रकरणी सुरुवातीस निलंगा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, मयताचा भाऊ सुमित वसंतराव तुरे यांच्या जबाबावरुन निलंगा पोलीस ठाण्यात बुधवारी दोघांविरुध्द कलम ३०२, ३४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शेजाळ हे करीत आहेत.