शून्यामुळे रेल्वे प्रवाश्यांवर आर्थिक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:45+5:302021-07-11T04:15:45+5:30
उदगीर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर रेल्वेगाड्या हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, विशेष गाडी हा नियम दाखवून शून्यने सुरू ...

शून्यामुळे रेल्वे प्रवाश्यांवर आर्थिक भुर्दंड
उदगीर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर रेल्वेगाड्या हळूहळू सुरू होत आहेत. मात्र, विशेष गाडी हा नियम दाखवून शून्यने सुरू होणाऱ्या गाडी क्रमांकाच्या गाड्यांचा तिकीट दर अद्याप कमी न झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेची सुरुवात झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने गाड्या बंद केल्या. कोरोनाची पहिली लाट ओसल्यानंतर विशेष गाडी म्हणून गाडी क्रमांकास शून्य जोडून देण्यात आला. त्यामुळे सर्वसाधारण तिकीटही आरक्षित करून प्रवास करणे बंधनकारक झाले. परिणामी, गाड्यांचे तिकीट दर वाढले. सर्वसामान्यांना परवडणारी वाहतूक म्हणून रेल्वे वाहतुकीची ओळख आहे. मात्र, या आरक्षित आणि वाढीव तिकिटामुळे प्रवाश्यांना नियमित तिकिटापेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत आहे. ही वाढ रद्द करून पूर्ववत तिकीट दर करण्याची मागणी सर्वसामान्य प्रवाशांची आहे.
उदगीर स्थानकातून ८ गाड्या धावतात...
उदगीर रेल्वे स्थानकातून बिदर- मुंबई, नांदेड- बेंगलोर, हैदराबाद- हडपसर, औरंगाबाद- हैदराबाद, सिकंदराबाद- शिर्डी,
विजयवाडा- शिर्डी, औरंगाबाद- रेनिगुंटा, लातूर- यशवंतपूर या आठ गाड्या धावत आहेत.
आरक्षणामुळे ऐन वेळेच्या प्रवासास खोडा...
सर्वसाधारण तिकिटाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तिकीट आरक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गाडी पहिल्या
स्थानकावरून सुटण्यापूर्वी दोन तास अगोदर आरक्षण तालिका तयार होते. त्यानंतर प्रवाश्यांना आरक्षण करता येत नाही. त्यामुळे ऐनवेळी प्रवासी तिकीट काढून प्रवास करू शकत नाही. परिणामी, रेल्वेचे उत्पन्न व प्रवासी संख्या कमी होत आहे.
एसटीप्रमाणे ऐनवेळी तिकिट द्यावे...
विशेष गाडीचा नियम काढून गाड्यांचे तिकीट दर पूर्ववत व्हावेत. तसेच सर्वसाधारण तिकिटाला आरक्षण करण्याचा नियमही शिथिल करण्यात यावा अशी प्रवाश्यांची भावना आहे. एसटी वाहकाकडे असल्यासारखे ऑनलाइन आरक्षण असलेले मशीन दिल्यास प्रवाशांची सोय होईल. शिवाय प्रत्येक स्थानकावर ऐनवेळी आरक्षित तिकीट मिळणारे टर्मिनल सुरू केल्यास सुलभता येईल.
- मोतीलाल डोईजोडे, सचिव, उदगीर रेल्वे संघर्ष समिती.