...अखेर स्मशानभूमीतील शेडची डागडुजी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST2021-08-28T04:23:52+5:302021-08-28T04:23:52+5:30
चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शवदाहिनीवर पावसाचे पाणी पडत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली ...

...अखेर स्मशानभूमीतील शेडची डागडुजी सुरू
चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शवदाहिनीवर पावसाचे पाणी पडत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने त्याची तत्काळ दखल घेत शेडच्या डागडुजीस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
येथील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे काम चांगल्या दर्जाचे झाले नाही. शहरातील एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पार्थिव सोमवारी रात्री येथील सार्वजनिक स्मशानभूमीत आणण्यात आले. प्रेतावर सरण रचल्यानंतर भडाग्नी देण्यात आला. दरम्यान, पाऊस सुरू झाला आणि शवदाहिनीत पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पेटलेल्या चितेवर थेट पाणी पडू लागल्याने एकाने पाणी टोपल्यात जमा करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पावसाचा जोर वाढला आणि अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना थांबण्यासाठी जागाही उपलब्ध नसल्याने मोठी अडचण झाली. येथील स्मशानभूमीत ग्रामपंचायतीने २००९ मध्ये सिमेंटची शवदाहिनी तयार केली होती. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास विविध अडचणी येत आहेत. २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. परंतु, या बांधकामाकडे अद्यापही दुर्लक्ष झाले. दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’मधून शुक्रवारी वृत्त प्रकाशित होताच नगरपंचायत प्रशासन खडबडून जागी झाले आणि डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.