...अखेर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात आजपासून सर्व आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:35+5:302021-05-24T04:18:35+5:30

चाकूर : चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना अवघ्या १० रुपयांत मिळणारी आरोग्यसेवा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पावणेदोन महिन्यांपासून बंद होती. येथील ...

... Finally all health services from today at Chakur Rural Hospital | ...अखेर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात आजपासून सर्व आरोग्यसेवा

...अखेर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात आजपासून सर्व आरोग्यसेवा

चाकूर : चाकूर येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना अवघ्या १० रुपयांत मिळणारी आरोग्यसेवा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पावणेदोन महिन्यांपासून बंद होती. येथील आरोग्यसेवेचा भार नळेगाव, चापोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर साेपविण्यात आला होता. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी ४०० ते ५०० रुपये मोजावे लागत होते. यासंदर्भात ‘लोकमत’मधून सतत वृत्त प्रकाशित केल्याने अखेर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासनाने बाह्यरुग्ण तपासणीसाठी सोमवारपासून तयारी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

चाकुरात ग्रामीण रुग्णालय आहे. कोरोना रुग्णांसाठी कृषी महाविद्यालयाच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे, तसेच ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड हेल्थ सेंटर पावणेदोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती सेवा नळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तर बाह्यरुग्ण, आंतररुग्ण व अन्य आरोग्य सेवांचा भार चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोपविण्यात आला; परंतु तेथील सुविधांत वाढ करण्यात आली नाही.

येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज १२५ ते १६० रुग्णांची नोंद असते. प्रसूतीसाठीच्या मातांची संख्या वेगळीच. रुग्णांना केवळ १० रुपयांच्या नोंदणी शुल्कावर तपासणीसह औषधी मिळत होती. मात्र, येथील ही सेवा बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, काही खाजगी डॉक्टरांनी तपासणी शुल्कात वाढ केली. कारण चाकूरहून चापोलीला ये-जा करण्यासाठी बस नाही. खाजगी वाहनासाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात.

ग्रामीण रुग्णालयात डेडिकेटेड हेल्थ केअर सुरू करणे महत्त्वाचे होते; परंतु दररोजची बाह्यरुग्ण तपासणीही महत्वाची होती. दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’मधून वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आल्याने आ. बाबासाहेब पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी लक्ष केंद्रित केले. प्रशासनाने त्याची दखल घेत सोमवारपासून ग्रामीण रुग्णालयातील रक्त तपासणी कक्षानजीकच्या दोन खोल्यांमध्ये दररोज बाह्यरुग्ण तपासणी सुरू होणार आहे. त्यासाठी डॉ. प्रियंका अंकुशे, डॉ. श्रीहरी कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाह्यरुग्ण तपासणीची वेळ सकाळी १० ते दुपारी २ अशी ठेवण्यात आली आहे.

विशेष कक्षात सेवा सुरू...

ग्रामीण रुग्णालयात सोमवारपासून बाह्यरुग्ण सेवा विशेष कक्षात सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत आंतररुग्ण विभाग आणि प्रसूतीसेवा सुरू करण्यात येणार आहे.

- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.

Web Title: ... Finally all health services from today at Chakur Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.