उदगीर तालुक्यात तापाचे रुग्ण वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:03+5:302021-08-20T04:25:03+5:30
उदगीर : शहरासह ग्रामीण भागात तापाच्या रुग्णांत वाढ झाली असून, शहरातील खासगी बाल रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून ...

उदगीर तालुक्यात तापाचे रुग्ण वाढले !
उदगीर : शहरासह ग्रामीण भागात तापाच्या रुग्णांत वाढ झाली असून, शहरातील खासगी बाल रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे ज्येष्ठ नागरिकसुद्धा सर्दी, खोकल्याने हैराण झाले आहेत. उदगीर तालुक्यात डेंग्यूचे चार रुग्ण आढळल्याची शासकीय आकडेवारी असून, खासगी बाल रुग्णालयात मात्र गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.
उदगीर शहर व परिसरात मागील पंधरा दिवसांपासून तापाच्या आजारात वाढ झालेली आहे. सद्य:स्थितीत डेंग्यूचे चार रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी दिली. शहरातील दत्त नगर भागातील डेंग्यूसदृश रुग्णाचा बुधवारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती असून, भीज पावसाने गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डासांची पैदास झाली आहे. त्यामुळे शहरात काही दिवसांपासून ताप व साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश रुग्णांची गर्दी आहे. शिवाय, उदगीर उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा तापाच्या रुग्णांवर नियमित उपचार चालू असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता पवार यांनी सांगितले. सततच्या ढगाळ व दमट वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम होऊन रोग प्रतिकार क्षमता कमी असणारे ज्येष्ठ व लहान बालक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरात धूर फवारणी सुरू...
शहरात फवारणी सुरू करण्यात आली आहे. तसेच विविध भागात फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करण्यात येत आहे. ज्या भागात नाली स्वच्छता होत नाही, त्या भागातील नागरिकांनी नगर पालिकेशी संपर्क साधावा. नागरिकांनी स्वच्छता पाळावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
- भारत राठोड, मुख्याधिकारी
ग्रामीण भागात अबॅटिंग मोहीम...
ग्रामीण भागात ४१ आशा स्वयंसेविका आणि ९ कर्मचाऱ्यांमार्फत दर १५ दिवसांनी मोहीम राबविली जात आहे. फॉगिंग करणे, अबॅटिंग करणे ही कामे ग्रामीण भागात चालू आहेत. डेंग्यूचे डास प्रामुख्याने अस्वच्छ पाण्यात तयार होता. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरातील नाल्या व गटारी स्वच्छ राहतील व डासांची उत्पत्ती होणार नाही याबाबत दक्ष राहावे.
- डॉ. प्रशांत कापसे, तालुका आरोग्य अधिकारी