महिलांचे कपडे फाडणाऱ्या ‘त्या’ अज्ञाताची लातूर शहरात धास्ती ! पाेलिस, स्थानिक नागरिकांची रात्रभर गस्त सुरू
By राजकुमार जोंधळे | Updated: April 11, 2024 00:05 IST2024-04-11T00:03:14+5:302024-04-11T00:05:54+5:30
याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांचे कपडे फाडणाऱ्या ‘त्या’ अज्ञाताची लातूर शहरात धास्ती ! पाेलिस, स्थानिक नागरिकांची रात्रभर गस्त सुरू
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील नांदेड नाका परिसरात रात्री महिलांचे कपडे फाडत फिरणाऱ्या अज्ञाताच्या टाेळीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अज्ञाताच्या टाेळीला पकडण्यासाठी विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस आणि स्थानिक नागरिक रात्र-रात्र जागून काढत आहेत; मात्र त्यांचा सुगावा लागत नसल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील नांदेड नाका परिसरातील गरुड चाैक, महादेव नगर, करिम नगर, प्रबुद्ध नगर, नूरजहाँ काॅलनी, जय नगर, बरकत नगर, संजय नगर, नाथ नगर आणि इंदिरा नगर परिसरात जवळपास दाेन आठवड्यापासून अज्ञात चाेरट्यांच्या टाेळ्या रात्री फिरत असल्याची चर्चा असून, घरात झाेपलेल्या महिलांचे कपडे ब्लेडच्या साहाय्याने फाडत असल्याचा प्रकार समाेर आला आहे.
या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. यातून महिलांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, नागरिकांची रात्रीची झाेपच उडाली आहे. तर महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्ती घरातील वस्तू चाेरून नेत नाही, ताे केवळ झाेपेत असलेल्या महिलांच्या अंगावरील कपडे ब्लेडच्या साहाय्याने फाडत आहे. घरातील खाद्यतेल घेऊन स्वत:च्या अंगाला लावत आहेत. त्याचबराेबर महिलांच्या अंगावरही टाकत आहेत. महिलांचा विनयभंग करत असल्याचे प्रकार समाेर आले आहेत.
हातामध्ये काठ्या घेऊन नागरिक रात्रभर रस्त्यावर...
गत दाेन आठवड्यापासून अज्ञात टाेळीची लातुरातील पूर्व भागात चांगलीच दहशत पसरली आहे. या टाेळीला पकडण्यासाठी, सुरक्षेसाठी स्थानिक नागरिक हातात लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्र घेऊन टाेळीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र ती टाेळी अंधाराचा फायदा घेत पसार हाेत असल्याने हाती लागत नसल्याचे चित्र आहे.
२० महिलांसाेबत घडला असा प्रकार...
लातुरातील नांदेड नाका, गरुड चाैक परिसरातील विविध भागात रात्री १ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घरात अज्ञात टाेळी घुसत आहे. त्यांच्याकडून महिलांचे कपडे फाडण्याचे प्रकार समाेर आले आहेत. आतापर्यंत किमान २० महिलांसाेबत असा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या भागातील नागरिक या टाेळ्यांना पकडण्यासाठी रात्र-रात्र जागत आहेत.
पाेलिसांनी वाढविली या भागात रात्रीची गस्त...
लातुरातील नांदेड नाका, गरुड चाैक परिसरातील विविध नगरात अज्ञात टाेळी रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा ताेडून घरात घुसत असल्याचा प्रकार समाेर आला आहे. घरात झाेपलेल्या महिलांचे कपडे फाडत असून, या भागात विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. लवकरच या टाेळीला अटक केली जाईल. - वैजनाथ मुंडे, पाेलिस निरीक्षक