नालेसफाईअभावी आजारांची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:11+5:302021-07-14T04:23:11+5:30
जळकोट : शहरात नालेसफाई होत नसल्याने पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह जलजन्य आजारांची भीती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत ...

नालेसफाईअभावी आजारांची भीती
जळकोट : शहरात नालेसफाई होत नसल्याने पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह जलजन्य आजारांची भीती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नगर पंचायतीने याकडे लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील नाल्यांची सफाई होत नसल्याने दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे विविध आजारांची भीती व्यक्त होत आहे. शहरातील श्रीकृष्ण मंदिर परिसर, मोमीन गल्ली, लद्दे गल्ली आदी ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागात तापाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच बागवान गल्ली, हनुमान चौक, महादेव मंदिर परिसर, गबाळे गल्ली, डांगे गल्ली, धुळशेट्टी गल्ली, लोहार गल्लीत डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत.
शहराला शुध्द पाणी पुरवठा करावा, प्रत्येक गल्लीत फवारणी करावी, तुंबत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करून उपाययोजना राबवावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष महेश धुळशेट्टे, नगरसेवक शिवानंद देशमुख, मोहम्मद अजीजभाई मोमीन, खादरभाई लाटवाले, ॲड. तात्या पाटील, दस्तगीर शेख, गोपाळकृष्ण गबाळे यांनी केली आहे.
आरोग्य विभागाकडून तपासणी...
शहर व तालुक्यातील घराेघरी जाऊन आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी करण्यात येईल. रुग्णांना तत्काळ उपचार दिले जातील. स्वच्छतेसंदर्भात नगर पंचायतीला सूचना करण्यात येतील. शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असतील तर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात येईल.
- डॉ. संजय पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी.