सासर, माहेरला सांभाळत दिली आरोग्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:33+5:302021-03-08T04:19:33+5:30
भातांगळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सगीरा जे. ए. पठाण-सिद्दीकी यांचे सासर व माहेर हे लातूरच आहे. माहेरकडील परिस्थिती ...

सासर, माहेरला सांभाळत दिली आरोग्य सेवा
भातांगळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सगीरा जे. ए. पठाण-सिद्दीकी यांचे सासर व माहेर हे लातूरच आहे. माहेरकडील परिस्थिती सर्वसाधारण असतानाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. भाऊ नसल्याने आई- वडील आणि बहिणींकडे त्याच जबाबदारीने लक्ष देतात. तसेच सासरकडे डॉक्टर पती, ज्येष्ठ सासू-सासरे असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. कोराेनाच्या संकटकाळात स्वत:बरोबर दोन्ही कुटुंबांची काळजी घेत, आरोग्य केंद्राअंतर्गतच्या ग्रामीण आणि शहरी भागांत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले. अनेकदा शहरातून काहीजण रात्री-अपरात्री गावात आल्यानंतर त्यांचे स्राव घेणे, विलगीकरण कक्षात ठेवणे असे कार्य करावे लागले. शाळेच्या विलगीकरण केंद्रातील व्यक्तींची तपासणी करण्याबरोबरच काही वेळेस विलगीकरणात एखादी महिला असल्यास तिच्या संरक्षणाची खबरदारीही त्यांनी घेतली.
आशा स्वयंसेविका, एएनएममार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याबरोबरच कंटेन्मेंट झोनला नियमित भेट देणे, काही गुंतागुंत निर्माण झाल्यास तपासणीसाठी लातूरला पाठविणे, समुदाय आरोग्याधिकाऱ्यांच्या मदतीने हाय रिस्कमधील व्यक्तींचा शोध घेणे असे कार्य त्यांनी केले. मोबाईल टीमच्या माध्यमातून त्यांच्या पथकाने ६०० बाधितांना शोधून काढले.
प्रत्येक गावास नियमित भेटी...
जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक गावात ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे नवीन व्यक्ती आल्यास तिची सहज माहिती होत असे. तसेच गावातील व्यक्ती बाहेरगावी जाण्यास पायबंद बसत असे. दरम्यान, सर्वांची नजर चुकवून गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे का, हे समजण्यासाठी आणि रेड झोन शोधण्यासाठी त्या ग्रामपंचायतीचा एकजण, तलाठी, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत त्या गावात फिरत असत.
गैरसमजुतीने गावकऱ्यांनी टाकले वाळीत...
महापूर येथे मनोविकार असलेला एकजण त्यांच्या घरी आला. तेव्हा गावकऱ्यांनी गावात येऊ दिले नाही. त्यामुळे तो शेतात थांबला. दरम्यान, त्याच्या अंगात ताप भरला. त्यामुळे त्याला कोरोना झाल्याचा गावकऱ्यांनी संशय व्यक्त करीत आम्हाला माहिती दिली. तपासणीसाठी त्याला ‘सर्वोपचार’कडे पाठविण्यात आले; पण अहवाल येईपर्यंत तिथे त्यास ॲडमिट करून घेण्यास नकार देण्यास आला. त्यामुळे त्याला कुठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला. अखेर शाळेत ठेवण्यात येऊन त्याची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता, असे डॉ. सगीरा पठाण यांनी सांगितले.
माणुसकीची जपणूक...
प्रत्येकजण आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत असतो. मात्र, महिला अधिकारी त्यापुढे जाऊन माणुसकी, भावना जपतात. त्यामुळे न्याय मिळतो आणि त्यातून कुठल्याही कामात यश मिळते, असे डॉ. सगीरा पठाण यांनी सांगितले.