सर्व्हर बंद पडल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:37+5:302021-07-15T04:15:37+5:30

अहमदपूर : खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन विमा भरण्यासाठी रेलचेल सुरू आहे. ...

Farmers rush to pay crop insurance due to server shutdown | सर्व्हर बंद पडल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

सर्व्हर बंद पडल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

अहमदपूर : खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन विमा भरण्यासाठी रेलचेल सुरू आहे. दरम्यान, बुधवारी बहुतांश ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव झाली. दरम्यान, मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यात खरिपाचे ७८ हजार हेक्टर क्षेत्र असून, ९० टक्के पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, ४० हजार हेक्‍टर आहे. त्यापाठोपाठ तूर, ऊस, कापूस, मूग, उडदाचा पेरा आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून तालुक्यातील सहा मंडळांत सोयाबीनचा अत्यंत कमी विमा आल्याने शेतकरी पीक विमा भरण्यास निरुत्साही दिसत आहेत. पीक विमा भरण्यासाठी १५ जुलै अंतिम तारीख असल्यामुळे आणि दोन दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीने विमा भरण्यासाठी सर्व्हर डाऊन असल्यामुळे, तसेच इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे महा-ई- सेवा केंद्रचालकही गाेंधळात पडले आहेत. कागदपत्रे अपलोड होत नसल्यामुळे केंद्र अडचणीत आहेत.

याबाबत महा-ई-सेवा केंद्रांनी इंटरनेट पुरविणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे केबल तुटली आहे त्यामुळे इंटरनेटला गती नाही, तसेच राज्यातील शेतकरी याच पोर्टलवर अर्ज करीत असल्यामुळे काही अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. ही तांत्रिक अडचण असली तरी शेतकऱ्यांना गुरुवारी रात्रीपर्यंत विमा भरणे गरजेचे असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पीक विम्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

इंटरनेटचा वेग कमी...

दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे, तसेच इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे कागदपत्रे अपलोड होण्यास अडचणी येत आहेत, असे महा-ई-सेवा केंद्राचे उदय गुंडिले यांनी सांगितले.

मुदत वाढवून द्यावी...

तालुक्यात ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीला लागले आहेत. खरीप पीक विम्याची तारीख वाढवून मिळाल्यास अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे शेतकरी दिलीप महाजन, प्रकाश संपते, विठ्ठल फुलमंटे यांनी सांगितले.

शेतकरी निरुत्साही...

पीक विमा भरूनही दोन वर्षांपासून अहमदपूर तालुक्याला केवळ तूर व ज्वारीचा कमी प्रमाणातील विमा मिळाला. त्यामुळे शेतकरी निरुत्साही आहेत. दहा वर्षांतून केवळ दोनदा चांगला विमा मिळाला. पीक विम्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, असे प्रगतिशील शेतकरी मनोहर पाटील यांनी सांगितले.

Web Title: Farmers rush to pay crop insurance due to server shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.