उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:56+5:302021-02-08T04:17:56+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील प्रकल्प यंदा भरल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी भुईमुगाला पसंती दिल्याने ...

उन्हाळी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील प्रकल्प यंदा भरल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी भुईमुगाला पसंती दिल्याने जवळपास ५० हेक्टर्सवर भुईमुगाचे पीक बहरले आहे. सध्या शेतकरी हात कोळपणीची कामे करीत आहेत.
तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगावसारखे मोठे प्रकल्प आहेत. मागील तीन- चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. यंदा परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्प तुडुंब भरले आहेत. त्यातच घरणी आणि पांढरवाडी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे कालवा सिंचन सुरू करण्यात आले आहे. शेतकरी त्याचा फायदा घेण्यासाठी विविध पिके घेत आहेत. सध्या तुरीच्या राशी झाल्या आहेत. त्यामुळे जमीन काळीभोर आहे. पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी उन्हाळी पिके म्हणून भुईमुगाचा पर्याय निवडत आहेत. काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची पेरणी केली असून आंतर मशागत करीत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील विविध गावांत ५० हेक्टर्स भुईमुगाची पेरणी झाली आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत पेरणी आवश्यक...
तालुक्यात यंदा उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असली तरी ज्या शेतकऱ्यांना घरणी, पांढरवाडी प्रकल्पाच्या कालवा सिंचनाचा लाभ होतो, असे शेतकरी सध्या भुईमुगाची पेरणी करीत असल्याचे दिसून येत आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंडळ कृषी अधिकारी बाळासाहेब गाढवे, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.
भुईमुगाला अधिक पसंती...
भुईमूग हे एकेकाळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पहिल्या पसंतीचे पीक होते; परंतु उत्पादन क्षमतेच्या स्पर्धेत आता भुईमुगाची जागा सोयाबीनने घेतली असली तरी उन्हाळी पीक म्हणून आजही शेतकरी भुईमुगालाच अधिक पसंती देत आहेत. तालुक्यात ५० हेक्टर्सपेक्षा अधिक क्षेत्रावर भुईमुगाचा पेरा झाला असून शेतकरी मशागत करताना दिसून येत आहेत. दरम्यान, रानडुकरे भुईमुगाचे मोठे नुकसान करीत असल्याचे संजीव गुणाले, धोंडिराम कारभारी, मेजर दिलीप बिरादार, विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.