महावितरणच्या उजनी कार्यालयात शेतक-याने केले विष प्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 19:14 IST2018-01-09T19:14:14+5:302018-01-09T19:14:33+5:30
कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले

महावितरणच्या उजनी कार्यालयात शेतक-याने केले विष प्राशन
उजनी (लातूर) : कृषीपंपाचे ६० हजार रुपये आलेले वीजबिल कमी करून दिले नसल्याच्या कारणाने एकंबी तांडा येथील एका शेतक-याने उजनी महावितरण कार्यालयात मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, शेतक-याची प्रकृती चिंताजनक असून, लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी धिरु राठोड (४२) यांना ६० हजार रुपयांचे कृषी पंपाचे वीजबिल आले आहे. सदर बिल कमी करून द्यावे म्हणून त्यांनी उजनी येथील महावितरण कार्यालयात अनेकदा खेटे मारले. मात्र संबंधित अभियंत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शहाजी राठोड पुन्हा मंगळवारी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आले. मला वीजबिल कमी करून दिले नाही, अनेकवेळा मागणी केली तरी ते कमी केले जात नाही, असे म्हणत विषारी द्रव असलेली बाटली काढून द्रव प्राशन केले. यावेळी महावितरणच्या कार्यालयात कर्मचारी उपस्थित नव्हते. दरम्यान, एकंबी तांडा येथील सरपंच शिवराज राठोड यांनी त्यांना उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दरम्यान, बेलकुंड येथील पोलीस चौकीचे अंमलदार एन.टी. कोडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सदर शेतकºयाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सरपंच शिवराज राठोड यांनी सांगितले.
उजनी येथील महावितरणचे शाखा अभियंता किरण क्षीरसागर म्हणाले, मंगळवारी मी कार्यालयात नव्हतो. कामानिमित्त आशिवला होतो. विषारी द्रव कोणत्या शेतकºयाने घेतले याची माहिती आपणाला नाही. शिवाय, आपल्याकडे बिलासंदर्भात कसलीही तक्रार आलेली नाही. ज्या शेतकºयांचे जास्त बिल आहे, त्यांना आपण हप्ते पाडून देतच असतो, असेही ते म्हणाले.