लातूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडलांत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:41+5:302021-08-23T04:22:41+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला असून जिल्ह्यातील तीन महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. रेणापूर ...

लातूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडलांत अतिवृष्टी
लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला असून जिल्ह्यातील तीन महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. रेणापूर तालुक्यातील रेणा नदीवरील रेणा बॅरेजेस तुडुंब भरला आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ५२० मि.मी. पाऊस पडला असून गतवर्षीच्या तुलनेत आणखीन २७.९ मि.मी पाऊस कमी आहे.
जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला. तांदुळजा रेणापूर आणि कासारखेडा महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. कासारखेडा महसूल मंडलात ८३.५, तांदुळजा महसूल मंडलात ६८.५ आणि रेणापूर महसूल मंडलात ११३.५ पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२० मि.मी.पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेत ५४८.८ मि.मी.पाऊस झाला होता. जो की गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७.९ मि.मी. कमी आहे.
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत लातूर तालुक्यात ३४.२, औसा तालुक्यात २३.६, अहमदपूर तालुक्यात ९, निलंगा २२.३, उदगीर २८.६, चाकूर २४.२, रेणापूर ५०.४, देवणी १४.८ आणि जळकोट तालुक्यात ८.३ मि.मी. पाऊस पडला आहे.
यंदाच्या पावसाळ्यातला सर्वदूर होणारा पहिला पाऊस...
जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडले आहेत. या सर्व महसूल मंडलांत कमी-जास्त प्रमाणात शनिवारी रात्री पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यापैकी कासारखेडा, तांदुळजा आणि रेणापूर या तीन महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून परिसरातील नदी-नाल्यांना पाणी आले आहे. उर्वरित ५७ महसूल मंडलांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे बहुतांश साठवण तलाव अद्यापि जोत्याखालीच आहेत.
मोठ्या पावसाची प्रतीक्षा; मांजरा प्रकल्पात ८४.९४१ द.ल.घ.मी. पाणीसाठा
मध्यम प्रकल्प, मोठे प्रकल्प आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत एकूण पाणीसाठा ८४.९४१ द.ल.घ.मी. आहे. यातील जिवंत साठा ३७.१८१ द.ल.घ.मी. असून मृत पाणीसाठा ४७.१३० द.ल.घ.मी. आहे. मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी धरण क्षेत्रात पाऊस होण्याची गरज आहे. यंदाच्या पावसाळ्यात पंधरा ते अठरा द.ल.घ.मी. नवीन पाणीसाठा झाला असल्याची माहिती प्रकल्प अभियंत्यांनी दिली.