विजेच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; आजपासून शहराचा पाणी पुरवठा होणार सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:15+5:302021-08-21T04:24:15+5:30
लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर तसेच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विजेचा बिघाड झाला होता. त्यामुळे ...

विजेच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; आजपासून शहराचा पाणी पुरवठा होणार सुरळीत
लातूर : लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर तसेच हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर विजेचा बिघाड झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद होता. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून, मांजरा धरणावरील काम अंतिम टप्प्यात आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होणार असून, आज (शनिवार)पासून लातूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
धनेगाव धरण आणि हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बुधवारी विजेचा बिघाड झाला. त्यामुळे मांजरा प्रकल्पातून पाणी उचलण्याची प्रक्रिया बंद झाली होती. धरणावरील दोन्ही पंप बंद होते. दरम्यान, इकडे हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. आता हरंगुळ येथील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, धनेगाव येथील काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. अधून-मधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे काम करण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम होईल, असे लातूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता नागनाथ कलवले यांनी सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा पंप सुरू करून शहरातील सर्व जलकुंभ भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर शनिवारी सकाळपासून नवीन वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
तीन दिवसांनी वेळापत्रक पुढे ढकलले...
पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. ज्या नगरांत शुक्रवारी पाणी येणार होते, त्या नगरांत सोमवारी पाणी येईल. जिथे सोमवारी पाणी येणार होते, तिथे गुरुवारी पाणी येणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वेळापत्रकात बदल केला आहे. पाणी पुरवठ्याची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडले जाईल, असेही अभियंता कलवले यांनी सांगितले.
शहरात आठ दिवसाआड पाणी...
मांजरा प्रकल्पात यंदाच्या पावसाळ्यात तेरा ते पंधरा एमएलडी नवीन पाणीसाठा झाला असून, पूर्वीप्रमाणेच शहरात आठ दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांत वीजबिल थकल्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी उचलणे बंद झाले होते तर आता विजेचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा बंद झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात या ना त्या कारणाने शहरवासीयांची दोनवेळा गैरसोय झाली आहे. पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीचे काम करणे आवश्यक असते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली आहे.