आठ महिन्याच्या चिमुकलीची मल्लखांबवरील पकड लय भारी! लातुरातील ‘दुर्गा’ची कमाल
By राजकुमार जोंधळे | Updated: July 23, 2023 00:01 IST2023-07-23T00:00:31+5:302023-07-23T00:01:28+5:30
अशीही नवलाई : मल्लखांबावर पकड दाखवून अचंबित केले.

आठ महिन्याच्या चिमुकलीची मल्लखांबवरील पकड लय भारी! लातुरातील ‘दुर्गा’ची कमाल
राजकुमार जाेंधळे, लातूर : आठ महिन्यांचे वय खरे तर दुडूदुडू रांगण्याचे मात्र या वयात लातूरच्या एका चिमुकलीने काही सेकंदाचीच का असेना, मल्लखांबावर पकड दाखवून अचंबित केले.
लातूरच्या जिल्हा क्रीडासंकुलात खेळाडूंच्या वसतिगृहासमोर मल्लखांब खेळाचे मैदान आहे. या मैदानावर नियमित मल्लखांबाचा सराव अनेक खेळाडू करीत असतात. या ठिकाणी दुर्गा भुसनुरे या चिमुकलीने मलखांब पोलवर अवघ्या ३० सेकंद ते ४० सेकंदांची पकड करीत सर्वांना अचंबित केले. रोज सायंकाळी चिमुकलीची आई संकुलात वॉकिंगसाठी येत असत दुर्गाला ती मल्लखांबचे प्रशिक्षक असलेल्या आशा भुसनुरे या आपल्या काकूजवळ सोडत असत, एके दिवशी ती रडत असल्याने प्रशिक्षक आशा यांनी तिला सहज मल्लखांब, वर चढविले. त्यावेळी ती गप्प झाली आणि तिने चक्क ३० ते ४० सेकंद मल्लखांबवरील पकड कायम ठेवली. हा दिनक्रम रोज सुरू राहिला.
प्रशिक्षक आशा भुसनुरेसह रामलिंग बिडवे या वरिष्ठ खेळाडूनेही तिला दररोज मल्लखांबवर पकड करण्याची सवय लावली. त्यामुळे तिला याचा लळा लागला. प्रशिक्षक आशा यांनी तिच्यातील हा गुण पाहून तिला उत्कृष्ट मल्लखांबपटू बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.