संपूर्ण नगर जिल्हा शिवसेनामय करण्याचा प्रयत्न : माजी आ.अनिल राठोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 18:18 IST2018-01-30T18:17:56+5:302018-01-30T18:18:12+5:30
सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेला पक्ष म्हणून शिवसेनेची संपूर्ण राज्यात ओळख आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी शिवसेनेत कार्यरत आहे

संपूर्ण नगर जिल्हा शिवसेनामय करण्याचा प्रयत्न : माजी आ.अनिल राठोड
केडगाव : सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेला पक्ष म्हणून शिवसेनेची संपूर्ण राज्यात ओळख आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी फळी शिवसेनेत कार्यरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार नगर शहर आणि जिल्ह्यात शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम करण्यात येत आहे. जनतेचे पाठबळ आणि सर्वसामान्य शिवसैनिकांचे काम या जोरावर संपूर्ण नगर जिल्हा शिवसेनामय करून भगवा फडकावण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून रणनिती आखण्यात येत आहे, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले.
शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी आ.राठोड यांची फेरनिवड झाल्याबद्दल नगर तालुका व जिल्हा शिवसेनेच्यावतीने त्यांचा शिवालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती रामदास भोर, डॉ.दिलीप पवार, गोविंद मोकाटे, व्हि.डी.काळे, प्रविण कोकाटे, गुलाब शिंदे, संदीप गुंड आदी उपस्थित होते.
माजी आ.राठोड म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुखांनी मोठ्या विश्वासाने आपल्यावर पुन्हा एकदा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येणार्या काळात नगर शहरासह जिल्ह्यात धडाडीने काम करून शिवसेनेची ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने काम करतील, असा विश्वास आहे.
सभापती रामदास भोर म्हणाले की, शिवसेना उपनेतेपदी अनिल राठोड यांची झालेली निवड सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठा आनंद देणारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्ते उत्साहात काम करून पक्ष संघटना मजबूत करतील.
फोटो ओळी : शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल माजी आ.अनिल राठोड यांचा सत्कार करताना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे. समवेत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, सभापती रामदास भोर, डॉ.दिलीप पवार, गोविंद मोकाटे, व्हि.डी.काळे, प्रविण कोकाटे, गुलाब शिंदे, संदीप गुंड आदी