शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:22+5:302021-07-20T04:15:22+5:30
लातूर : आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संस्कृतीचा संस्कार होणे ...

शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडावा
लातूर : आजच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्माचा आधार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संस्कृतीचा संस्कार होणे गरजेचे आहे. शिक्षणातून सुसंस्कारक्षम नागरिक घडला पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वा दीक्षांत समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात सोमवारी पार पडला, यावेळी ते बोलत होते. मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, शैलेश पाटील चाकूरकर, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. यशवंत वळवी उपस्थित होते. डॉ. शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले, समृद्ध भारत बनवायचा असेल तर आपल्याला महापुरुषांचे विचारकार्य व तत्त्वज्ञान सर्वांपर्यंत रुजवणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून एकमेकांमध्ये बंधुभाव वाढला पाहिजे. आपले कर्तव्यही आपण ओळखले पाहिजे.
प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर मांडला. या कार्यक्रमामध्ये एकूण ४२४पैकी निवडक गुणवंतांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर बेडगे व डॉ. उमा कडगे यांनी केले तर रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय गवई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, माजी आमदार ॲड. सोनकवडे, माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, डॉ. एम. एस. दडगे, घाडगे, डॉ. यू. व्ही. बिरादार, प्रा. गिरजप्पा मुचाटे, सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे आदींसह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रारंभी प्रा. विजयकुमार धायगुडे, प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गीता गिरवलकर, प्रा. अश्विनी रोडे यांनी विद्यापीठ गीत सादर केले.
नवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती करावी...
आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असून, तरुणांनी आपल्यामधील उणिवा व संधी शोधून नवनवीन शिक्षण क्षेत्राची निर्मिती केली पाहिजे. तसेच आव्हानांना पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.