जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबताच शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. मृग नक्षत्रात पेरणीयोग्य व समाधानकारक पाऊस झाल्याने चापोलीसह परिसरातील आनंदवाडी, नायगाव, हिप्पंळनेर, झरी, हणमंत जवळगा, उमरगा यल्लादेवी, येणगेवाडी, अजनसोंडा (बु ), धनगरवाडी, तेलगाव, मुळकी, उमरगा कोर्ट येथील शेतकऱ्यांनी महागडे सोयाबीन, उडीद व मुगाची पेरणी आणि कापसाची लागवड केली आहे; मात्र गत सहा दिवसांपासून अचानक पावसाने दडी दिली आहे. सद्यस्थितीला जमिनीतील ओलाव्यामुळे पेरलेल्या बियाण्यांची कोवळे मोड वर आली आहेत. असे असले तरी जोरदार पावसामुळे काही भागात बियाणे दडपल्या गेल्याच्याही तक्रारी आहेत.
पावसाच्या उघडीपीमुळे दुबार पेरणीचे संकट...
चापोली परिसरात पावसाने मागील सहा दिवसांपासून उघडीप दिल्याने तापमान व उकाड्यात वाढ झाली आहे; मात्र अल्प पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाने १७ जूनपर्यंत पेरण्या करू नयेत, असे आवाहन करूनही पेरणीसाठी घाई केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवणार आहे.