भूसंपादनाअभावी तेरणावरील पुलाचे काम ७ वर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:19+5:302021-05-29T04:16:19+5:30
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील बाजारपेठ जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची आहे. येथील बाजारपेठेशी जिल्हा, परजिल्ह्यातील तसेच कर्नाटक परिसरातील ७० ते ...

भूसंपादनाअभावी तेरणावरील पुलाचे काम ७ वर्षांपासून रखडले
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील बाजारपेठ जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाची आहे. येथील बाजारपेठेशी जिल्हा, परजिल्ह्यातील तसेच कर्नाटक परिसरातील ७० ते ८० खेड्यांची व्यापाराची नाळ जुळलेली आहे. येथील तेरणा नदीवरील तगरखेडा, औराद शहाजानी या उच्चस्तरीय पुलाचे काम गेल्या ७ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे.
औराद शहाजानीतील बाजारपेठेचा तगरखेडा, हालसी, तांबरवाडी, देवणी तालुक्यातील वलांडी, कर्नाटकातील तुगाव, आळवाई आदीसह अनेक गावांशी संबंध आहे. व्यवहारासाठी ये- जा करण्याकरिता हा पुल अत्यंत महत्वाचा आहे. पुलाचे काम रखडल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या पुलाचे काम केवळ २ हजार ९५२ चौ.मी.च्या भूसंपादनाअभावी सात वर्षांपासून रखडले आहे. शिवाय, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या आदेशाने या पुलाचे बांधकाम व भूसंपादनासाठी साधारणतः ९० लाख गेल्या सहा महिन्यांपूर्वी मंजूर झाले आहेत. केवळ भूसंपादनाचा तांत्रिक विषय व कोविडमुळे हा प्रश्न रखडला आहे. हे काम तात्काळ मार्गी लावून परिसरातील नागरिकांचा प्रवासाचा मार्ग खुला करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर अभय साळुंके, तगरखेडाच्या सरपंच केवळबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.