ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे ग्राम कृषी विकास समित्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:09 IST2021-05-04T04:09:29+5:302021-05-04T04:09:29+5:30
चापोली : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून विविध योजना व प्रकल्प हाती घेण्याच्या कामास ...

ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे ग्राम कृषी विकास समित्या रखडल्या
चापोली : ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून विविध योजना व प्रकल्प हाती घेण्याच्या कामास प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी ग्रामपंचायतीत ग्राम कृषी विकास समितीची स्थापन करणे अनिवार्य आहे. मात्र, चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे या समित्या स्थापन झाल्या नाहीत. परिणामी, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसली आहे.
शासनाच्या कृषीविषयक सर्व योजना ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रचार व प्रसार आवश्यक आहे. विविध योजनांचा नियमित आढावा घेऊन त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. स्थानिक स्तरावरील हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत आदी बाबी लक्षात घेऊन ग्रामपंचायत क्षेत्रात विविध प्रकारच्या पीक लागवडीसंबंधी नियोजन करणे तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. समितीच्या कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या मर्यादा लक्षात घेऊन कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी अधिक उत्पन्न कसे घेता येईल, याबाबत कार्य करण्याचा या समितीचा मुख्य उद्देश आहे.
तसेच समितीमार्फत कृषी व इतर कृषी निविष्ठा, एकात्मिक कीड, एकात्मिक पोषण यांचा प्रचार, नियमित शेती, फळबाग लागवडीचा आढावा घेणे, शेतीपूरक योजनांबद्दल मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. शासनाकडून अशा प्रकारची समिती स्थापन करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न आहे. मात्र, ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे चाकूर तालुक्यातील एकूण ७१ ग्रामपंचायतींपैकी एकाही ग्रामपंचायतीने आपल्या गावात ग्राम कृषी विकास समित्या स्थापनच झाल्या नाहीत.
समितीचे सरपंच अध्यक्ष...
सदरील समितीचे पदसिद्ध अध्यक्ष हे सरपंच असून ग्रामसेवक सदस्य सचिव आहेत. उपसरपंच सदस्य असून प्रगतशील शेतकरी, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादन कंपनी / शेतकरी गटाचे प्रतिनिधी, महिला बचत गट प्रतिनिधी, कृषीपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक हे या समितीचे सहसचिव आहेत. या समितीची सभा प्रत्येक महिन्यातून एकदा घेणे बंधनकारक आहे.
कोरोनामुळे अडचणी...
चाकूर तालुक्यातील कुठल्याही गावांत या समिती स्थापना झाली नाही. समित्या स्थापन करण्यासंबंधी गटविकास अधिका-यांसोबत चर्चा झाली. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समित्या स्थापन करण्यासाठी विलंब झाला आहे. लवकरच समित्या गठीत करण्यात येतील, असे तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार म्हणाले.
ग्रामसेवकांना आदेश...
सर्व ग्रामसेवकांना समिती स्थापन करण्याबाबत आदेश दिले आहेत. कोविडमुळे ग्रामसभा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समिती गठण करण्यासाठी अडचणी येत आहेत. ऑनलाइन ग्रामसभा घेण्याबाबत आदेश आले असून लवकरच समित्या गठीत होतील, असे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सांगितले.
योजनांचा लाभ मिळेना...
समिती गठीत नसल्याने शेतकऱ्यांना शासन योजनांची माहिती मिळत नाही. लवकरात लवकर समिती गठण करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केली.