ऑटोत विसरलेली ४७ हजारांची रक्कम चालकाने केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:44+5:302021-07-11T04:15:44+5:30
सोमनाथापूर येथील प्रेमदास सोनकांबळे हे मजुरी करतात. त्यांच्या मुलीवर उपचारासाठी ते येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी सकाळी निघाले होते. ...

ऑटोत विसरलेली ४७ हजारांची रक्कम चालकाने केली परत
सोमनाथापूर येथील प्रेमदास सोनकांबळे हे मजुरी करतात. त्यांच्या मुलीवर उपचारासाठी ते येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी सकाळी निघाले होते. दरम्यान, लोणी येथील रवींद्र रमेश साताळे यांच्या ऑटो (एमएच २४/ ई ३५३८) मधून ते दवाखान्यात पोहोचले. दरम्यान, सोनकांबळे यांची पैशाची पिशवी ऑटोत विसरली. त्यानंतर, ऑटो चालकास कमालनगर (कर्नाटक) येथील प्रवाशी भाडे मिळाल्यामुळे तो तिकडे जात होता. तेव्हा चालकास पिशवी दिसली. त्याने कर्नाटकाकडे जाणाऱ्या प्रवाशांकडे चौकशी केली असता, त्यांनी ही पिशवी आमची नाही, म्हणून सांगितली. तेव्हा रुग्णालयात गेलेल्या प्रवाशांची पिशवी असल्याचे त्याच्या लक्षात आले.
दोन तासांनंतर त्याने ती पिशवी घेऊन दवाखान्यात आला. ती पिशवी सोनकांबळे कुटुंबीयांच्या हवाली केली. तेव्हा सोनकांबळे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले. दरम्यान, सोनकांबळे हे शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यातच त्यांच्या मुलीने वडिलांना मोबाइलद्वारे ऑटो चालकाने रक्कम परत आणून दिल्याचे सांगितले.
ही घटना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांना समजल्यानंतर, त्यांनी ऑटो चालक रवींद्र सताळे यांना ठाण्यात बोलावून घेऊन सत्कार केला. प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले.